बेळगाव ः प्रतिनिधी
चार वर्षात महापालिकेतील मराठी सत्ताधारी गटाला एकीचे महत्त्वच कळलेले नाही. यामुळेच महापौर-उपमहापौर निवडणुकीत अर्थकारणावर डोळा ठेवून एकत्र येणारे सत्ताधारी वर्षभर एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसतात. असाच प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. विद्यमान महापौरांना डावलून गटातील वरिष्ठानी वैयक्तिक प्रतिष्ठेला महत्त्व देण्याचा खटाटोप चालविला आहे. यातून एकदा सत्ताधारी गटात बेदिलीचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी गटातील वरिष्ठांच्या मनमानीला कंटाळून दहा सदस्यांनी समविचारीची वेगळी मोट बांधली होती. यानंतर यावर्षी झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत सत्ताधारी व समविचारीत पदांवरून समझोत्याचे राजकारण झाले. काही दिवस दोन्ही गटाचे सदस्य निवडणुकीच्या राजकारणापुरते एकत्र आले. नंतर स्थायी समिती निवडणुकीप्रसंगी सत्ताधारी आणि समविचारीतील समझोता संपुष्टात आला.
यामुळे तीन स्थायी समित्या विरोधकांच्या ताब्यात गेल्या. त्यातूनही सत्ताधारी गटाला शहाणपण सुचलेले नाही. निवडणुकीनंतर सत्ताधारी गटातील वरिष्ठांनी महापौर-उपमहापौरांत बेबनाव निर्माण करण्याचे काम केले. यामुळे काही दिवस महापौर आणि उपमहापौरात सुसंवाद दिसत नव्हता. आता स्मार्टसिटी योजनेच्या कामांवरून सत्ताधारी सदस्यांनी महापौरांनाच लक्ष्य बनविले आहे. स्मार्टसिटी कामाच्या शुभारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल काहींनी महापौरांवर आक्षेप व्यक्त केला आहे.
स्मार्टसिटी कामानंतर अलिकडेच महापौरांच्या कक्षाचे सुशोभिकरण झाले. याच्या उद्घाटन समारंभावरूनही गटातील सदस्यांनी महापौरांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केल्याची मनपात चर्चा सुरू आहे. महापौर कक्ष सुशोभिकरणाचे श्रेय मिळविण्यासाठी काही वरिष्ठांनी हेकेखोरपणा सुरू केला आहे. यातूनच सत्ताधारी गटात नव्याने बेदिली निर्माण झाली आहे.