Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Belgaon › जॉबकार्डधारक लोकप्रतिनिधींवर निबर्र्ंध

जॉबकार्डधारक लोकप्रतिनिधींवर निबर्र्ंध

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 7:56PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

रोजगार हमी योजनेतील बनवेगिरीला आळा घालण्यासाठी जॉबकार्डधारक ग्राम पंचायत सदस्यांना कामादिवशी बैठकीला उपस्थित राहण्यास मज्जाव करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. बहुतांश सदस्य आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बैठकीला उपस्थित राहून कामावर हजर असल्याचे दाखवितात. याला यामुळे चाप बसणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हा ओम्बडसमन ए. जे. धुमाळे यांनी बजावला आहे. यामुळे बनवेगिरी करणार्‍या लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत.

ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगारासाठी नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. परंतु, यामध्ये भ्रष्टाचाराने ठाण मांडले असून ठेकेदारांच्या माध्यमातून कामे उरकण्यात येत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींचाही वाटा असून जॉबकार्डधारक लोकप्रतिनिधींना आळा घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला आहे. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणार्‍या विकासकामासाठी बहुतांश निधी रोजगार हमी योजनेतून पुरविण्यात येतो. या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत जनतेला पैसा उपलब्ध होतो. पर्यायाने रोजगारासाठी नागरिकांचे अन्य ठिकाणी होणारे स्थलांतर थांबते. यामध्ये रोजगार हमी योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

परंतु अलीकडे या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली असून बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. काही लोकप्रतिनिधी आपल्या नावे जॉबकार्ड काढून रोजगार हमी योजनेचे वेतन लाटतात.
हा प्रकार अलीकडे उघडकीस आल्यामुळे जॉबकार्डधारक लोकप्रतिनिधींनी कामादिवशी बैठकीला उपस्थित राहू नये, असा महत्त्वपूर्ण आदेश बजावला आहे. यामुळे बोगस जॉबकार्डधारक ग्रा. पं. सदस्यांना सावध होण्याची गरज आहे. अन्यथा अशा भ्रष्टाचारी सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. असा आहे आदेश 

रायबाग तालुक्यातील मेखळी ग्र्रा. पं. च्या सदस्याच्या नावावर जॉबकार्ड होते. त्यांनी खेळाच्या मैदानावर कामासाठी हजेरी लावल्याचे दाखविण्यात आले. त्यासाठी त्यांना वेतन अदा करण्यात आले. याप्रकरणी जि. पं. कडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ओम्बुडसमनकडे प्रकरण वर्ग करून चौकशी करण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधींनी कामावर हजर असताना बैठक अथवा सरकारी कामात सहभागी होऊ नये, असा आदेश बजावला आहे. 

- ए. जे. धुमाळे,  ओम्बडसमन, बेळगाव जि. पं.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकप्रतिनिधींनी रोजगार हमी योजनेतील कामावर जाण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु, त्यांनी कामावर हजर असताना कोणत्याही सरकारी कार्यक्रमात अथवा ग्रा. पं. च्या बैठकीला उपस्थित राहण्यास मुभा नाही.