होमपेज › Belgaon › उचगावचे पुढील संमेलन महाराष्ट्रातच 

उचगावचे पुढील संमेलन महाराष्ट्रातच 

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागात मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी संमेलने भरविली जातात. सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सुटेल व पुढील संमेलन आम्ही महाराष्ट्रातच घेऊ, असा विश्‍वास संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी व्यक्‍त केला. उचगाव साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुंभार, देवदत्त परुळेकर, कवी नारायण पुरी, अनिल दीक्षित, प्रा. जयराम खेडेकर उपस्थित होते. 

मळेकरणी देवीचे पूजन नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष एल. आय. पाटील यांनी केले. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक मोहन बेळगुंदकर, सभामंडपाचे उद्घाटन अशोक धानवडे, व्यासपीठाचे उद्घाटन गजानन सावगावकर, सरस्वती प्रतिमा पूजन तानाजी पाटील, ज्ञानेश्‍वर प्रतिमा पूजन  ग्रा.पं. अध्यक्षा योगिता देसाई, उषा होनगेकर, छ. शिवाजी महाराज प्रतिमा पूजन एस. एल. चौगुले यांच्या हस्ते झाले. डॉ. कुंभार, बाळासाहेब काकतकर, एन. ओ. चौगुले, रवी मोरे, नंदकुमार देसाई, कलमेश्‍वर सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पाटील, चेंबर्सचे अध्यक्ष उमेश शर्मा आदींच्या हस्ते रोपट्याला  पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन पार पडले. 

मळेकरणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर केले. जीवन होनगेकर, मिथिल जाधव, किरण होनगेकर, यलाप्पा पाटील, एल.वाय. जाळगे, सूर्याजी हंडे, दीपक नवार, वामन कदम, किसन लाळगे, यलाप्पा हुंद्रे, सौरभ जाधव, उषा होनगेकर, संदीप होनगेकर, एन. ओ. चौगुले, संदीप पावशे आदींच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार पुस्तक भेट देऊन करण्यात आला.

लक्ष्मण होनगेकर यांची मराठा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सातारा येथील ढोल-ताशा पथक, कल्लेहोळ येथील झांजपथक, तुरमुरीतील झांजपथक, ज्ञानेश्‍वर भजनी मंडळ आदींचा सत्कार करण्यात आला. होनगेकर म्हणाले, येथील साहित्यिकांची महाराष्ट्र सरकार दखल घेत नाही. ती घेणे गरजेचे आहे. साहित्य संमेलने हा शब्दाचा उत्सव व कल्पनेचा सोहळा  हे. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. बी. शिंदे, विजय खांडेकर यांनी केले.

संमेलनातील ठराव  सीमाप्रश्‍न 

सर्वोच्च न्यायालयात आहे. प्रश्‍नामुळे दोन भाषिकांमध्ये, दोन राज्यामध्ये वैरत्व निर्माण झाले आहे. या प्रश्‍नाची लवकर सोडवणूक व्हावी. निकोप समाजव्यवस्थेसाठी वैर धोक्याचे ठरते व त्यासाठी महाराष्ट्र, केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे संमेलन करते. 

ठराव 2 : भारतीय राज्यघटनेने या देशातील सर्व धर्मियांना व भाषकांना समान न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. घटनेचा आदर सर्वांनी राखला पाहिजे. घटनेनुसार सीमाभागात पंधरा टक्क्याहून अधिक असणार्‍या मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत सर्व सरकारी कागदपत्रे, परिपत्रके देण्याची सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाने, उच्च न्यायालयाने केली आहे. याची कार्यवाही व्हावी. 

ठराव 3 : विविधतेतील एकता देशाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाला आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यावर कोणीही आघात करू नये. राष्ट्र व राष्ट्रभाषेला प्राधान्य देऊन देशातील सर्वधर्मीय व सर्व भाषकांमध्ये एकोपा व सामंजस्य राखावे. 

ठराव 4 : सीमाभागात मराठी साहित्य संमेलने, मराठी भाषा, संस्कृती जपण्याचे कार्य करणार्‍या संघ, संस्था यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने अर्थसाहाय्य मंजूर करावे. 

ठराव 5 : करवेच्या म्होरक्याने ‘छ. शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा देण्यास कर्नाटकात बंदी असावी, असे वक्‍तव्य करुन शिवरायांचा अवमान केला आहे. हे संमेलन त्याचा निषेध करते. 

संत ज्ञानेश्‍वर कुशल समाजसंघटक

संत ज्ञानेश्‍वरांनी बंडाचा पवित्रा घेतला व निद्रिस्त समाजाला जागे केले. हे करताना वारकरी समाजाचा पाया त्यांनी रोवला. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद वारकरी संप्रदाय मानत नाही. ज्ञानेश्‍वरांचा नाथ सांप्रदाय तरीही त्यांनी वारकरी सांप्रदाय पुढे नेला. ते कुशल समाज संघटक होते, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक वेंगुर्ला येथील देवदत्त परुळेकर यांनी केले. 

उचगाव संमेलनातील तिसर्‍या सत्रात ते बोलत होते. परुळेकर म्हणाले, वेदांचे सार उपनिषदात व उपनिषदाचे सार भगवद‍्गीतेत आहे. वारकरी सांप्रदायात संतांचा जयजयकार होतो. पुंडलिक हे वारकरी सांंप्रदायाचे आदर्श आहेत. त्याकाळी ज्ञानेश्‍वरांना समाज संघटित करायचा होता. म्हणून सर्व सांप्रदाय एकत्रित आणले.

संत हे उत्तम मानोसपचारतज्ज्ञ आहेत. ‘नामजप’ यज्ञ हा सर्वात महान यज्ञ आहे. या जपाने पुरोहितानी तयार केलेली दुकाने बंद झाली. सातशे वर्षे साहित्य जिवंत ठेवण्याचे काम वारकरी सांप्रदायाने केले. सावता माळी यांनी पहिली अभंगरचना केली. नामदेवरायांनी पंढरपूर ते पंजाबपर्यंतचा 1200 कि.मी.चा प्रवास करून वारकरी सांप्रदायाचा प्रसार केला. गुजरात, राजस्थान, बिहार व पंजाब येथे त्यांची  पाचशेपेक्षा अधिक मंदिरे आहेत. मराठीतील पहिले आत्मचरित्रपर प्रवासवर्णन नामदेवांनी लिहिले, असे ते म्हणाले.

पंढरपूरला जाणारी प्रत्येक व्यक्‍ती माळकरी नसते. प्रत्येक माळकरी व्यक्‍ती वारकरी असत नाही आणि प्रत्येक वारकरी संत असत  नाही. ज्याला दया व समाजाबद्दलचा कळवळा आहे, तो संत. कृषी संस्कृतीवर आधारित आपल्या आषाढी व कार्तिकी वारी असतात. वारकरी हा पंढरपूरला जातो. म्हणजे आपल्या माहेरी जातो. मराठी माणसाचे कुलदैवत पंढरपूर आहे. आपल्या संतांनी आत्मजागृतीचा मार्ग दाखवला आहे. तुकाराम महाराजांनी बुवाबाजीवर कठोर प्रहार केले, असे त्यांनी सांगितले.

विडंबन काव्याने बहरले संमेलन

आई, प्रेम, जागड धुता, काटा, जीएसटी या सारख्या अनेक कवितांचा आढावा रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. ‘आंब्याची कोय’ या कवितेने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. अशा अनेक कविता ‘हास्य कविसंमेलनात’ सादर करण्यात आल्या. संमेलनातील हे दुसरे सत्र  होते. प्रा. जयराम खेडेकर (जालना) यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या हास्य  कविसंमेलनाने उंची गाठली.  रसिकांनी उत्स्फूर्तपणे याचा लाभ घेतला.  ‘गाढवाच्या गर्दीत घोड्याने काय करावे, सणसणीत दोन लाथा घालाव्यात’ या या त्यांच्या कवितेने हास्य पिकले.

‘आंब्याची कोय’ या कवितेने माहेरी असलेल्या मुलींना आईची आठवण करून दिली आणि सर्वांचे डोळे पाणावले. ‘पावसाची कविता’ सर्वांना आवडली, तीसुद्धा आईची आठवण करून देणारी होती. तर ‘झय झुय झय झुय पाऊस आला पानातून’ ही पावसाची कविता अतिशय सुंदरपणे सादर केली. नांदेडचे नारायण पुरी यांनी भारदस्त आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध केले. ‘जांगड गुत्ता’ या कवितेत ते म्हणाले, प्रेमाचा जांगड गुत्ता गं, जीव जाला हा खलबत्ता, उखळात तोंड खुपसले तोंड प्रिये‘ या प्रेमाच्या कवितेने  हास्यलकेर उमटली. ‘पुढल्यास ठेच मागचा शहाणा’ याप्रमाणे ‘पायामध्ये चालतो गं, सखे बोराटीचा काटा’, ही प्रेमकविता सादर करून नवीन नवरा- बायकोचे नाते अधोरेखित केले.  

कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे असते. कवितेत कवी रमून जाणारा असतो. कविता हेच त्याचे जीवन असते, असे ते म्हणाले. ‘कवीच्या व्यथा’ यासारख्या अनेक कविता सादर केल्या. त्यांच्या सर्वच कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. तिसरे कवी पुण्याचे अनिल दीक्षित यांनी सध्याच्या वातावरणात चाललेल्या चालीवर आपल्या कविता सादर केल्या. गाजलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील गीताच्या चालीवर त्यांनी ‘नोटाबंदी’ची विडंबन कविता सादर केली. ते म्हणाले, ‘उरात होते धडधड बंदी आली उरात झाले झिंग झिंग झिंगाट, या गाण्याने सर्वांना हसवले.

आईची कविता सादर करून आई त्यागाचे, प्रेमाचे प्रतीक असल्याचे सांगितले. ते म्हणाले ‘आई’ हा शब्द लिहिताना कागदही हेलावतो. आईच्या हसर्‍या डोळ्यात कधीही पाणी आणू नये, अशा शब्दात आईची व्याख्या सांगितली. जीएसटीबद्दल त्यांनी अतिशय सुरेख कविता सादर केली. या कवितेत व्यापार्‍यांच्या व्याख्या सांगितल्या. स्वागताध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी या कवींना पुस्तक भेट देऊन स्वागत केले.

कथांतून उडविले हास्यतुषार

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात होणारे लग्न आणि एकूणच या समारंभात घरच्या मंडळींची उडणारी धांदल, चालीरिती यावर अनेक विनोद होत असतात. त्याचे हुबेहुब चित्रण कथाकथनातून सादर करीत संजय कळमळकर यांनी हास्याचे तुषार उडविले.  संमेलनातील कथाकथन सत्रात त्यांनी ‘हसायदान’मधून कथा सांगून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. 

पहाटे फिरायला जायच्या पद्धती कशा असतात, त्यामध्ये पती-पत्नी यांचे नाते किती प्रेमळ आहे. हे कसे ओळखावे याचे अनेक विनोद त्यांनी सांगितले. ग्रामीण लग्नामध्ये  गमती-जमती, मजेदार किस्से घडत असायचे. लग्नसोहळ्यातील रुसवे-फुगवे कोणकोणत्या ठिकाणी आणि कशाप्रकारे असत. ते प्रसंग कळमळकर यांनी हुबेहुब उभे केले. 

लग्नसमारंभात राजकारणी मंडळी पक्षाचा आणि आपला प्रचार कसा प्रकारे करतात ते त्यांनी फुलवून सांगितले. ‘सारे प्रवासी घडीचे’ या कथेत त्यांनी बस प्रवासामध्ये घडणार्‍या प्रवासांचा तपशील सांगितला. ग्रामीण भागात पूर्वी बस आल्यानंतर लोकांची कशी धांदल उडायची, गाडीमध्ये जागा मिळविण्यासाठी होणारी धावपळ आणि ती अडवून ठेवण्यासाठी वस्तू कशा ठेवल्या जायच्या याचे किस्से त्यांनी ऐकविले. गावापासून शहरापयर्ंत जाणार्‍या बसगाडी जाताना घडणार्‍या गमती-जमती सांगून त्यांनी श्रोत्यांना हास्य सफर घडविली. 

ग्रंथदिंडीत झांज-ढोलताशा लक्षवेधी

ढोल-ताशा आणि झांजपथकाचा निनाद, मराठमोळ्या वेशातील तरुणी, भगव्या पताका आणि ध्वज, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष, टाळमृदंगाचा गजर अशा थाटात उचगावमधील ग्रंथदिंडी लक्षवेधी  ठरली. श्री गणेश विठ्ठल- रुक्मिणी मंदिरापासून ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. गणपत गल्ली मार्गे शिवाजी महाराज चौकातून मळेकरणी देवीच्या अंमराईतील शामियानात दिंडी दाखल झाली. 

स्वराज्य रक्षक झांजपथक कल्लेहोळ आणि तुरमुरी येथील शिवदैवत झांजपथक दिंडीत सहभागी होते. मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनी भगवेध्वज घेऊन मराठमोळ्या वेषात सहभागी होत्या. कंग्राळी येथील अश्‍वांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  सातारा येथील छावा लाठी मेळ्याने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवारबाजी आणि लाठीकाठीचा यात समावेश होता.

यामध्ये 40 युवक सहभागी होते. गावातील प्रत्येक गल्लीत उभारलेले शिवशाहीतील आकर्षक देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. उचगाव ग्रामपंचायत सदस्य, विविध युवक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिंडीत सहभागी होते.