Tue, Jul 23, 2019 02:01होमपेज › Belgaon › मार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा

मार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 9:30PMबेळगाव : प्रतिनिधी

वाढत्या शहरीकणामुळे विकास व बदल होत असले तरी याचे अनेक घातक परिणाम शहरापासून जवळच असणार्‍या ग्रामीण भागावर होताना दिसत आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असणार्‍या मार्कंडेय नदीला गटारीचे स्वरूप येत आहे. वाढलेले केंदाळ व सोडण्यात येणारे सांडपाणी नदीला धोकादायक ठरत आहे. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. वेळीच खबरदारी घेणे काळची गरज आहे. मात्र संबंधित प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मार्कंडेय नदीला भविष्यात बळ्ळारी नाल्याचे स्वरूप प्राप्त होण्यास वेळ लागणार नाहे.

खानापूर तालुक्याच्या बैलूर गावातून उगम पावलेली नदी वाहत बेळगाव तालुक्यात येते. या गावांमधून वाहत येणार्‍या मार्कंडेय नदीला शहरापासून जवळ असणार्‍या गावांचा फटका बसत आहे. शहर व उपनगरातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी प्रदूषित बनत आहे. उन्हाळ्यात कोरडी असणारी नदी सांडपाण्यामुळे वाहती असते.
याचा परिणाम नदीच्या पाण्यावर शेती करणार्‍यांच्या शेती व्यवसायावर होणार आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून निवडूण येणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सदस्यांनी शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 

सध्याच्या घडीला नदीपात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधून शेती उपयोगासाठी पाणी अडविण्यात येत आहे. या पाण्यामध्ये साठणारा गाळ व सोडण्यात येणारे सांडपाणी नदीच्या आसपासच्या शेतकर्‍यांसाठी धोक्याचे आहे. जिल्हा पंचायतीकडून नदीचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी पात्रातील गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असणार्‍या बजार समितीच्या नेत्यांनी साफ दुर्लक्षच केले आहे. शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी व शेती व्यवसायाला पूरक ठरणार्‍या नदीच्या संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.