Wed, Sep 26, 2018 18:49होमपेज › Belgaon › गुणपत्रिका छपाईतील भ्रष्टाचार रोखा 

गुणपत्रिका छपाईतील भ्रष्टाचार रोखा 

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 9:25PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील विद्यापीठांच्या गुणपत्रिका छापण्यात राज्य सरकारने हस्तक्षेप चालविला आहे. यामुळे भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. पूर्वीप्रमाणे विद्यापीठांना गुणपत्रिका छपाईची मुभा देण्यात यावी, अशी मागणी अ. भा. विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली. उपरोक्त मागणीचे निवेदन बुधवारी सरदार्स मैदानापासून मोर्चा काढून जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना देण्यात आले.

राज्यातील विविध विद्यापीठांतर्गत येणार्‍या गुणपत्रिका संबंधित विद्यापीठाकडून छापण्यात येतात. परंतु, यावर्षी सरकारकडून हस्तक्षेप करण्यात आला आहे. सरकारकडून एकाच प्रकारच्या गुणपत्रिका छापण्यासाठी राज्यस्तरीय ठेका देण्यात आला आहे. यामध्ये भ्रष्ट ठेकेदारांना आर्थिक फायद्यासाठी कंत्राट दिले आहे. यामध्ये संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा स्वार्थ आहे. यामुळे हा प्रकार थांबवून पूर्वीप्रमाणे विद्यापीठांना गुणपत्रिका छापण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी मांडण्यात आली.

राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलगुरुंची वानवा आहे. यामुळे विद्यापीठांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय दर्जा घसरत असून सरकारने त्यांची त्वरित नेमणूक करावी. बंगळूर, म्हैसूर विद्यापीठ, राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठ, कायदा विद्यापीठ, तुमकूर व जानपद विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या जागा रिक्त आहेत. तेथे नेमणूक करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप करण्यात आला.
अ. भा. विद्यार्थी परिषदेचे नगर सचिव रोहित उमनाबादीपठ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.