Tue, May 21, 2019 23:10होमपेज › Belgaon › युवा मेळाव्यात उमटला मराठीचा हुंकार

युवा मेळाव्यात उमटला मराठीचा हुंकार

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 12:05AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेनकनहळ्ळी येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवचरित्र, सीमाप्रश्‍नाचा जागर करण्यात आला. मेळाव्यामध्ये  युवकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय  होती.  कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर,  प्रकाश मरगाळे यांच्याहस्ते करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन खंडू डोईफोडे, स्वामी विवेकानंद प्रतिमापूजन दिनेश ओऊळकर, राजमाता जिजाऊ प्रतिमापूजन लता पावशे यांच्याहस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी साहित्यिक बी. बी. देसाई (बेळवट्टी) व शिवसंत उपाधी मिळविलेले संजय मोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन दीपक दळवी व मनोहर किणेकर यांच्याहस्ते करण्यात आला.

मेळाव्यासाठी गावात भगवे ध्वज लावून घरोघरी रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. मान्यवरांचे गावच्या वेशीत आगमन होताच सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून स्वागत करण्यात आले.  त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवव्याख्याते खंडू डोईफोडे यांच्याहस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.  मिरवणुकीमध्ये झांजपथक सहभागी झाले होते. त्यांच्या दणदणाटाने युवकांच्या उत्साह भरला होता. मिरवणुकीच्यासमोर अश्‍वारुढ स्वार मराठमोळ्या वेशात सहभागी झाले होते. यामुळे मिरवणुकीत शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. गल्लीत ठिकठिकाणी भगवे ध्वज उभारण्यात आले होते.  मिरवणुकीत तालुक्यातील अनेक गावातील युवक, महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, ता. पं. सदस्य नारायण नलवडे, रावजी पाटील, नारायण कदम, नीरा काकतकर, माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे, कमल मन्नोळकर, प्रेमा जाधव, ज्योती गवी, एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, आर. के. पाटील, महेश जुवेकर, माजी एपीएमसी सदस्य मोनाप्पा पाटील, एल. आय. पाटील, बी. डी. मोहनगेकर, संतोष मंडलिक, बाबाजी देसूरकर, राजू किणेकर, बसवंत घाटेगस्ती, सागर सावगावकर, कलाप्पा घाटेगस्ती, निंगाप्पा मोरे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांनी पुढे यावे

सीमालढा हा निष्ठेवर आणि त्यागावर आजवर तेवत ठेवण्यात आला आहे. मराठी माणसांना महाराष्ट्रात जाण्याचा ध्यास लागून राहिला आहे. हा लढा न्यायालयात सुरू असला तरी रस्त्यावरची लढाई महत्त्वाची आहे. यासाठी युवकांनी चळवळीत अग्रेसर व्हावे, असे मत मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी मांडले. दळवी म्हणाले, सीमाप्रश्‍नासाठी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा त्याग केला आहे. त्याला सीमा नाही, ही लढण्याची धमक त्यांना भाषाप्रेमातून निर्माण झाली आहे. मराठी माणसाचे खरे प्रेरणास्थान छ. शिवाजी महाराज आहेत. त्यांनी मावळे निर्माण केले. आणि स्वराज्य उभे केले. 

 आजच्या पिढीने शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे. हातात तलवार घेऊन शांतता निर्माण करणारा जगातील हा पहिला राजा होता. त्यांनी हातातील तलवारीचा वापर अन्याय करण्यासाठी नव्हे तर न्याय देण्यासाठी केला. यामुळेच आजही त्यांचे विचार प्रेरणादायी असून त्याचे अनुकरण युवकांनी करावे. एका हातात तलवार घेतली तर दुसर्‍या हातात नांगर घेतला. हे महाराजांचे खरे वैशिष्ट आहे. रयतेचे राज्य महाराजांना अभिप्रेत होते. ते त्यांनी कृतीतून दाखवून दिले. प्रजाहित त्यांनी अखेरपर्यंत महत्त्वाचे मानले.

लोकेच्छा व्यक्‍त करा

सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढाई महाराष्ट्र सरकार ताकतीने लढत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई करण्यात येत नसून निश्‍चितच यश मिळणार आहे. न्यायालयीन लढ्याबरोबर जनांदोलनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे रस्त्यावरची लढाईदेखील तितकीच आवश्यक असून जनतेने लोकेच्छा मतपेटीतून व्यक्त करावी, असे आवाहन महाराष्ट्र सरकारचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांनी केले.  भाषावार प्रांतरचना करताना जिल्हा हा घटक धरल्यामुळे सीमाबांधवावर अन्याय झाला आहे. यासाठी गाव हे घटक धरण्याची आवश्यकता आहे. त्यातून लोकांना न्याय मिळतो. शेवटच्या घटकाला प्रशासकीय कामात सहभागी होता येते. यासाठी पूर्ण ताकदीने न्यायालयात महाराष्ट्र सरकार आपली मागणी मांडत आहे.

अ‍ॅड. हरिष साळवे यांच्यासारखे तज्ज्ञ आपली बाजू मांडत असून यामुळे कर्नाटक बिथरले आहे. यातूनच कुरापती काढण्यात येत असून न्यायालयात मराठी माणसांना न्याय मिळणार आहे. हा लढा सनदशीर मार्गाने सुरू आहे. यामुळे कोणत्याही मराठी माणसाने बिथरून जाऊ नये. म. ए. समिती आपले दैवत असून सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मराठी माणसाने एकनिष्ठ राहावे, असे आवाहन त्यांनी  केले. 

हा दुसरा स्वातंत्र्यलढा

आजच्या पिढीला  स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेता आला नाही. मात्र इंग्रज गेले तरी सीमाभागातील मराठी बांधव कर्नाटकाच्या जोखंडात अडकले आहेत. त्यांना मुक्त करण्यासाठी सुरू असणारा हा लढा म्हणजे दुसरा स्वातंत्र्यलढा असल्याचे मत माजी आ. मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले. किणेकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी मराठी माणूस गुलामगिरीचे जीणे जगत आहे. त्याला त्याच्या भाषेत कागदपत्रे मिळत नाहीत. कारभार होत नाही. कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. यामुळे आम्ही स्वतंत्र नसून पारतंत्र्यातच आहोत. यासाठी स्वातंत्र्यानंतरची ही दुसरी लढाई समितीने पुकारली असून या लढ्यात मराठी बांधवांनी सहभागी व्हावे.
मराठी युवकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी खोटा इतिहास राजकीय पक्षाकडून पसरविण्यात येत आहे.

 हे धोकादायक आहे. मराठी युवकांनी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मतासाठी मराठी माणसाचा खोटा कळवळा दाखविणार्‍या राजकीय पक्षांना दूर ठेवून समितीशी द्रोह करण्याचा प्रयत्न करू नये. यावेळी माजी महापौर यांनी  घरभेद्यांचा चांगलाच समाचार घेतला. 

जिजाऊंनी माणसे उभी केली : पावशे

ज्यावेळी महाराष्ट्रावर अनेक परकीय सत्तांनी ठाण मांडले होते, मराठे दुसर्‍यांची सेवा करण्यात धन्यता मानत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांमध्ये निर्माण केली. त्यांनी माणसे निर्माण करण्याचे काम केले, असे मत लता पावशे यांनी मांडले. त्या ‘राजमाता जिजाऊ’ या विषयावर मेळाव्यात बोलत होत्या.  पावशे म्हणाल्या, राजमाता होण्याचे काम त्यांनी स्वकर्तृत्वावर केले. त्यांनी सुरुवातीला स्वकियांचादेखील विरोध पत्करावा लागला. मात्र त्यांनी न डगमगता स्वराज्य निर्माणासाठी शिवाजी महाराजांना उभे केले. शिवाजी महाराजांच्या हातात त्यांनी सोन्याचा नांगर दिला. त्यातून रयतेचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. मावळ्यांच्या मनात अन्यायाविरोधात चीड निर्माण करण्याचे काम जिजाऊंनी केले.

यामुळे शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची निर्मिती केली. रयतेच्या हिताला प्राधान्य दिले. परंतु, सध्या खरा इतिहास लपवून खोटा इतिहास सांगितला जात आहे. खरा इतिहास समाजासमोर येण्याची आवश्यकता आहे. दोन समाजात भांडणे लावून राजकारण्याकडून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो हाणून पाडण्याची आवश्यकता  आहे.