होमपेज › Belgaon › दूषित पाण्यामुळे नागरिकांना चर्मरोग

दूषित पाण्यामुळे नागरिकांना चर्मरोग

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:54PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दोन महिन्यापासून भांदुर गल्लीतील ड्रेनेज वाहिनी फुटली असून त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना अनेक चर्मरोगांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्वरित दुरुस्ती करावी, रस्ता करावा या मागणीसाठी नागरिकांनी बुधवारी नगरसेविकेला घेराव घालून जाब विचारला. भांदुर गल्ली येथील ड्रेनेज पाईप दोन महिन्यापूर्वी फुटले आहे. यातील घाण पाणी जलवाहिनी व गटारीत शिरत असून त्यातून अनेक नागरिकांना चर्मरोग झाले आहेत. दुर्गंधी पसरली आहे. यामुळे त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. तासभर रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी धाव घेऊन नागरिकांना शांत केले.

ड्रेनेजमधील घाण पाणी जलवाहिनीमध्ये मिसळते. हे दूषित पाणी नागरिकांना नाईलाजास्तव वापरावे लागत आहे. यामुळे चर्मरोगाची लागण अनेकांना झाली आहे. अनेक नागरिकांना नायटा, फोड होत आहेत. याकडे मनपाने दुर्लक्ष केले असून संताप्त नागरिकांनी याचा जाब विचारला. नगरसेविका ज्योती चोपडे यांना नागरिकांनी घेराव घातला. मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली असून ही दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी लावून धरली. चोपडे आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली.

चोपडे यांनी हे काम आ. फिरोज सेठ यांच्याकडे येत असून त्यांच्या निधीतून भंगीबोळाचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. तुम्ही याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यास कामात अडथळा येईल, असे सांगितले. यामुळे महिलांनी भंगीबोळ व रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून दररोज अपघात घडत आहेत.  मंगळवारी गल्लीतील काही महिलांनी चोपडे यांना या समस्येबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी हे काम आपल्या अखत्यारीत येत नसून आ. फिरोज सेठ यांच्या निधीतून सुरू असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

यामुळे बुधवारी नागरिकांनी आंदोलन छेडले. घटनास्थळी पोलिसानी धाव घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. रस्ताकाम आणि ड्रेनेज दुरुस्तीचे ठाम आश्‍वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे महिलांनी ठणकावले. यावर महापौर संज्योत बांदेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आज गुरुवारी सकाळी 11 वा. भेटीचे आश्‍वासन दिले. यानंतर समस्या दूर करू अशी ग्वाही दिली. नंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.