Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Belgaon › बाजारपेठेत भोगी ची लगबग

बाजारपेठेत भोगी ची लगबग

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 7:33PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

स्नेह, आपुलकीचा मकर संक्रांत सण सोमवारी साजरा होत आहे.  संक्रांतीपूर्वी भोगी साजरी केली जाते. यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. बाजारात रंगबिरंगी तिळगुळासह वाणाचे साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे.  नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीचेे महत्त्व आहे. हिंदूधर्मीयांत पहिल्या दिवशी भोगी, दुसर्‍या दिवशी संक्रांत तर तिसर्‍या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. प्रत्येक सणाप्रमाणेच मकार संक्रांतीमध्ये महिलांच्या कामाची लगबग वाढलेली असते. भोगीसाठी घरोघरी बाजरीची भाकरी तयार केली जाते. विविध प्रकारच्या चटण्या, लोणी, वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. संक्रांतीत हिवाळ्याला अनुसरून भोजनाचा खास बेत असतो.

वाटाणे, मटार, गाजर, कांदापात, लालभाजी, काकडी, घेवडा, पावटा, हरभरा, सोले अशा भाज्यांची बाजारात आवक वाढली आहे.  बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदीसह उपनगरातील शहापूर, खासबाग, अनगोळ भागात भाजी  खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. संक्रांतीला काळे वस्त्र परिधान केले जाते. यामुळे कापड दुकानांत काळी वस्त्रे खरेदी केली जात आहेत.संक्रांतीला नववधूना हलव्याचे दागिने दिले जातात. बाजारात विविध प्रकारचे दागिने दाखल झाले आहेत. हलव्याचे मंगळसूत्र, बाजुबंद, पैंजण, अंगठी असे दागिने खरेदी करण्यात येत आहेत. छोट्यांसाठी तिळगुळदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे आढळून आले.  मेंदीचे साहित्य, बांगड्या खरेदी करण्यात येत आहे. सणानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमांना उधाण येते. महिला संघटना हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या नियोजनाची तयारी करत आहेत.