होमपेज › Belgaon › सीमालढ्यात ‘कोल्हापूर’ही कायम तुमच्या साथीला

सीमालढ्यात ‘कोल्हापूर’ही कायम तुमच्या साथीला

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:46PM



बेळगाव : प्रतिनिधी

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्रात येण्याची सीमावसीयांची तळमळ अद्वितीय आहे. मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. सीमालढ्यात कोल्हापूर कायम तुमच्यासोबत आहे’, असे प्रतिपादन कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी केले. सावगाव येथे तालुका म. ए. समिती महिला आघाडीने रविवारी महिला मेळावा आयोजिला होता.

त्यावेळी सौ. महाडिक बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या लता पावशे होत्या. सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन प्रा. गीता मुरकुटे (कार्वे), जिजाऊ प्रतिमापूजन पावशे व शिवप्रतिमेचे पूजन सौ. महाडिक यांनी केले. व्यासपीठावर जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, ता. पं. सदस्या निरा काकतकर, महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुनीता कोरजकर होत्या. महाडिक म्हणाल्या, सीमाबांधवावर कर्नाटकचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रास्ताविक माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे यांनी केले. सूत्रसंचालन बसवंत घाटेगस्ती यांनी केले. आभार ता. पं. सदस्या निरा काकतकर यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.