Wed, Jul 17, 2019 00:41होमपेज › Belgaon › साहित्य संमेलनाला हवी नियोजनाची ‘झालर’

साहित्य संमेलनाला हवी नियोजनाची ‘झालर’

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 11 2017 8:13PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगुंदी येथे रविवारी पार पडलेल्या साहित्य संमेलनाने याठिकाणी आजवर झालेल्या संमेलनांची उंची मोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यामुळे रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र संमेलनादरम्यान आयोजनामध्ये उडालेली धांदल आणि सत्रांचे कोलमडलेले वेळापत्रक यांनी गालबोट लावण्याचे प्रयत्न केले. पुढील संमेलनात काही पथ्ये सांभाळल्यास संमेलनाला वेगळी झळाळी निश्‍चितच मिळू शकते.  

सीमाभागात होणार्‍या साहित्य संमेलनांची सुरुवात रविवारी झालेल्या बेळगुंदी संमेलनाने झाली. येत्या दोन महिन्याच्या काळात रसिकांना अनेक संमेलनांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. यामाध्यमातून शब्दांचा उत्सव येत्या काळात सीमाभागात फुलणार आहे. याची नांदी बेळगुंदी संमेलनाने केली आहे. संमेलनामध्ये सर्वाधिक प्रभावी ठरले ते अध्यक्ष अभिराम भडकमकर यांनी मांडलेले प्रभावी विचार. सीमाभागात होणार्‍या संमेलनामध्ये येणारे साहित्यिक प्रामुख्याने सीमावासियांच्या वेदना कुरवाळण्याचे काम करतात. त्यामाध्यमातून टाळ्या वसूल करून घेतात. मात्र ठामपणे विचार देण्याचे टाळतात. यामुळे संमेलने जरी अनेक होत असली तरी वैचारिक घुसळण होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.

याला छेद देण्याचे काम भडकमकर यांनी केले. त्यांनी लेखक का लिहितो?, साहित्यिकांचे समाजभान कितपत जागे असते? असे मूलभूत प्रश्‍न उपस्थित करून राज्य सत्ता आणि झुंडशक्तीकडून होणारी होरपळ मांडली. दुसर्‍या सत्रापासून संमेलनाचे वेळापत्रक कोलमडले. कविसंमेलनाच्या वेळेत दोन व्याख्याने घेण्यात आली. त्यानंतर कविसंमेलनाचा केवळ सोपस्कार पार पाडण्यात आला. कविसंमेलनाध्यक्ष दयासागर बन्ने हे प्रभावी कवी आणि सूत्रसंचालक आहेत. मात्र त्यांना केवळ व्यासपीठावर बसविण्यात आले. यामुळे कविसंमेलन कोसळले. यामध्ये काही निमंत्रित कवींना वेळ देण्यात आला नसल्यामुळे त्यांची नाराजी संयोजकांना सहन करावी लागली. संमेलनाचे उद्घाटन करताना  आ. संजय पाटील यांनी मांडलेली भूमिका मराठीचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. परंतु,  ही भूमिका कायम ठेवणे अपेक्षित आहे. त्यातून सीमाभागात मराठी वृद्धिगंत होण्यास निश्‍चितच हातभार लागेल, यात शंका नाही.