होमपेज › Belgaon › 87 हजार नव्या मतदारांची भर; 44 हजार यादीतून ‘डिलिट’

87 हजार नव्या मतदारांची भर; 44 हजार यादीतून ‘डिलिट’

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 7:50PMबेळगाव  ;  प्रतिनिधी 

जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वय पूर्ण झालेल्या युवा मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नोव्हेंबर 30 पासून मतदारयादी छाननी आणि नवीन मतदारांच्या नावाची यादी तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 87,812 मतदारांचा मतदारयादीत समावेश करण्यात आला आहे. 44,289 मतदारांना यादीतून विविध कारणाने डिलिट करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक झाली आहे. त्यानुसार मतदार केंद्रांची संख्याही वाढली आहे. यावेळी नव्याने  व्हीव्हीपॅट नूतन प्रणाली अवलंबिण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये 1200 मतदारांसाठी तर शहरी भागात 1400 मतदारांसाठी मतदान केंद्रे तयार करण्यात येत  आहेत. 

गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी 43,523 मतदार अधिक झाले आहेत. नोव्हेंबर 30 पासून जिल्ह्यामध्ये मतदारयादी छाननी काम सुरू आहे. या अंतर्गत ऑनलाईन जवळपास 90,937 नवीन अर्जांपैकी 3841 अर्ज निवडणूक आयोगाने विविध कारणानी रद्द केले आहेत. सध्या 87,812 मतदारांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मार्च 1 किंवा 2 रोजी वेबसाईटवर मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाईन दाखल करण्यात आलेल्या अर्जांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन 11,888 अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 11,822 अर्जांना अनुमोदन देण्यात आले तर 66 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. 

विधानसभा मतदारसंघामध्ये एका मतदारसंघातून दुसर्‍यात बदली करून घेण्यासाठी ऑनलाईन 20,451 अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी 20,429 अर्जांना अनुमोदन देण्यात आलेे  तर 20 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. मतदारांची वाढलेली संख्या पाहता 18 मतदारसंघात निवडणुकीसाठी 368 नवीन मतदान केंद्रे सुरू करण्यासाठी तयारी चालविली आहे. निवडणुकीसाठी जवळपास 35 हजार कर्मचारी कार्यरत राहणार  आहेत. 

युवा मतदार वाढले,18 मतदारसंघांतील   संख्येतही वाढ  

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दहा दिवसांच्या आधी मतदार यादीमध्ये नाव समावेश करणे, दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा आहे, अशा अर्जांची छाननी करून यादीत समावेश करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र घेऊनच मृत व्यक्तींची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. 

- डॉ. सुरेश इटनाळ,  अप्पर जिल्हाधिकारी