Wed, Jun 26, 2019 23:51होमपेज › Belgaon › कुद्रेमानी रस्ता दुरुस्तीला प्रारंभ

कुद्रेमानी रस्ता दुरुस्तीला प्रारंभ

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:40PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अनेक दिवसापासून खराब झालेला कुद्रेमानी ते बेळगाव-वेंगुर्ला जोडरस्ता दुरुस्तीला अखेर शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमचे गाव, आमचा रस्ता योजनेतून रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. परंतु ठेकेदाराने अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम केले. यामुळे सहा महिन्यातच रस्ता खराब झाला. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

याबाबत दै. पुढारीतून वारंवार आवाज उठविण्यात आला. त्याचबरोबर गावातील सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने माजी आ. मनोहर किणेकर व जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित कामाच्या ठेकेदाराला रस्ता करण्यास भाग पाडले. हा रस्ता सुमारे तीन कि. मी. इतका असून निकृष्ट कामामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या मार्गावरून ऊस वाहतूक जोराने सुरू आहे. यामुळे हा रस्ता करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत ग्रा. पं. ने देखील तक्रार केली होती. याची दखल घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, साईड पट्टी आदी कामे करण्यात येणार आहेत. हे  काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.