होमपेज › Belgaon › किणयेला 11 रोजी होणार युवा मेळावा

किणयेला 11 रोजी होणार युवा मेळावा

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 8:15PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुका म. ए. समिती युवा आघाडी सक्रिय झाली असून 12 जानेवारी रोजी बेनकनहळ्ळी येथे झालेल्या मेळाव्यानंतर किणये येथे पश्‍चिम भागातील युवा कार्यकर्त्यांचा मेळावा 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्ते तयारीला लागले असून प्राथमिक बैठक नावगे येथे पार पडली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मराठी युवकांना लक्ष्य करून त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांकडून सुरू आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या तालुका म. ए. समितीने युवा मेळाव्याचे सत्र सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. किणये येथे होणार्‍या मेळाव्याला किमान पाच हजार युवक जमविण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. त्यानुसार जागृती मोहीम हाती घेतली आहे.

बेनकनहळ्ळी येथे झालेल्या युवा मेळाव्याला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद लाभला. यामुळे उत्साह दुणावलेल्या कार्यकर्त्यांचा दुसरा मेळावा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी सावगाव येथेही महिला मेळावा घेण्यात आला. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला. युवा मेळाव्याच्या तयारीला पहिली बैठक नावगे येथे घेण्यात आली. यावेळी 250 हून अधिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून विविध सूचना मांडल्या. मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला. माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, युवा  मेळाव्याच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नव्या पिढीला सीमाप्रश्‍नाबाबत मार्गदर्शन होण्याची गरज आहे. त्याचबरोबर ज्या शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन मराठी माणूस झुंज देत आहे, त्यांचा इतिहासदेखील युवकांना ऐकविण्यात येणार आहे. त्यातून सीमाप्रश्‍नाच्या लढ्याला नवी धार येणार आहे. युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील म्हणाले, पश्‍चिम भाग हा मराठी माणसांचा बालेकिल्ला आहे. या भागात मराठी माणसांचे वर्चस्व आहे.


अध्यक्षांच्या राजीनाम्याचा तिढा

युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांनी आपला राजीनामा युवा आघाडीच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला आहे. वैयक्तिक अडचणीमुळे पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. यामुळे युवा आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. राजीनाम्यारबाबत निर्णय घेण्यासाठी अकरा जणांची कमिटी नेमली असून त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु, बहुतांश कार्यकर्त्यांतून अ‍ॅड. पाटील यांचा राजीनामा मंजूर करू नये, असा सूर व्यक्त होत आहे.