Thu, Jun 20, 2019 20:43होमपेज › Belgaon › कन्‍नड फलकांवरून व्यापार्‍यांत नाराजी

कन्‍नड फलकांवरून व्यापार्‍यांत नाराजी

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 8:41PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या  निर्देशावरून मनपा अधिकार्‍यांनी शहरातील व्यापार्‍यांना दुकानांवरील फलक कन्‍नडमध्ये लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.  काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कन्‍नड संघटनांच्या बैठकीत जिल्हाधिकारी झियाउल्‍ला यांनी शासकीय कार्यालयात सर्व व्यवहार कन्‍नडमध्येच करण्यात यावा. ग्राम पंचायतींचा कारभारही कन्‍नडमधॅनच करावा. कानडीला प्राधान्य देण्यात यावे. बँकांचा व्यवहार कन्‍नडमधूनच करण्यात यावा, अशी सूचना अधिकार्‍यांना केली होती.

याची दखल घेऊन मनपा अधिकार्‍यांनी शहरातील व्यापार्‍यांना आस्थापनांचे फलक कन्‍नडमध्ये लावण्याची सूचना केली आहे. यामुळे व्यापारीवर्गात गोंधळ माजला आहे. याबाबत मनपा अधिकार्‍यांनी पत्रके वाटून व्यापार्‍यांना कन्‍नड फलक लावण्यासाठी सूचना केली आहे. प्रशासनाच्या एकाधिकारशाही कारभारावर तीव्र नााजी व्यक्‍त करण्यात येत आहे. व्यापारी आस्थापनांनवर मराठी, कन्‍नड व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत फलक असताना प्रशासनाकडून मात्र केवळ कन्‍नडचा अट्टाहास धरण्यात येत असल्याने नागरिकांतून प्रशासनाच्या कारभाराबद्दल परखड मत व्यक्‍त करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना  तिन्ही भाषेतील फलक समजण्यास सोयीचे होत असताना प्रशासनाची भुमिका मराठीविरोधी घेतली जात असल्याने 

जनसामान्यातून सरकारच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहेेे. मनपा अधिकार्‍यांना याबाबत विचारले असता जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या निर्देशानुसार आपण काम करत असल्याचे सांगण्यात आले. अधिकार्‍यांच्या या भूमिकेमुळे व्यापार्‍यांची गोची झाली आहे. अन्यथा परवाना नूतनीकरण करण्यावर गंडांतर येण्याची शक्यता असल्याने व्यापार्‍यांना प्रशासनाचा मुका मार सहन करावा लागत आहे.  प्रशासनाकडून मारून मुटकून कन्‍नड भाषा सक्‍ती केली जात असल्याने  संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. केवळ कन्‍नड संघटनांना खूश करण्यासाठी प्रशासनाने हे धोरण अवलंबल्याचा आरोप करण्यात येत आहेे. 
 

सरकारच्या आदेशाची कार्यवाही

जिल्हाधिकारी झियाउल्‍ला म्हणाले, असा कोणताच आदेश जारी केलेला नाही. सरकारने यापूर्वी केलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी केली जात आहे. सरकारने आदेश काढला असताना आपण आदेश काढण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. राज्यभाषा कन्‍नड असल्याने आद्यक्रम दिला पाहिजे.