होमपेज › Belgaon › क्रिकेट मैदानाला मिळतोय इंटरनॅशनल टच

क्रिकेट मैदानाला मिळतोय इंटरनॅशनल टच

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 11 2017 8:24PM

बुकमार्क करा

बेळगाव : श्रीकांत काकतीकर

रणजी आणि अन्य प्रतिष्ठेच्या क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी आयोजनानंतर बेळगावातील ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट मैदानावर प्रथमच महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने बेळगावच्या क्रिकेट मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे निश्‍चित केले आहे. या अंतर्गत 26 कोटी 70 रु. खर्च करून स्टेडियमभोवती नव्या सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहेत.

गेल्या 20 वर्षापासून बेळगावातील क्रिकेट मैदानासाठी केएससीएचे सदस्य व बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, सचिव दीपक पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयत्न केले. त्यातूनच ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियम उभे राहिले आहे. या मैदानावर 16 वर्षाखालील  राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सामने झाले आहेत. त्याचबरोबर तामिळनाडू, पंजाब, गुजरात दरम्यान रणजी सामने खेळविण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात 23 वर्षाखालील सी. के. नायडू चषक स्पर्धेंतर्गत कर्नाटक विरुद्ध पश्‍चिम बंगाल सामना झाला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अक्षर पटेल तसेच जसप्रित बुमराह यांनीही या मैदानावर रणजी सामना खेळाला आहे. 

आजवर या मैदानावर खेळलेल्या खेळाडूंनी बेळगावच्या स्टेडियम आणि खेळपट्टीचे कौतुक व्यक्त केले आहे. खेळाडूंना बेळगावचे हवामानही चांगलेच भावले होते. या पार्श्‍वभूमीवर तीन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बेळगाव शहरातील क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. त्या अंतर्गत 26 कोटी 70 लाख रु. खर्च करून स्टेडियमच्या पश्‍चिम भागाकडे नव्या सुविधा कामांना सुरुवात झाली आहे. स्टेडियमच्या पश्‍चिम भागात प्रेक्षक गॅलरीसह व्यायामशाळा  बार-रेस्टॉरंट, किचन, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, कार्यकारिणी सदस्यांना राहण्यासाठी 26 खोल्या, प्रसाधनगृह, पार्टी हॉल, कार्यालयीन सभागृह, वाहनतळ आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.

पुढील वर्षाच्या मध्यावधीस ही कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला खेळाडूंच्या सरावासाठी 5 नव्या खेळपट्ट्या बनविल्या जात आहेत, अशी माहिती अविनाश पोतदार यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.  भारत- बांगला महिला क्रिकेट अ-संघादरम्यान बेळगावच्या क्रिकेट मैदानावर टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.  या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेमुळे बेळगावचे नाव देश-विदेशापर्यंत पोहोचले आहे.