Mon, Jun 24, 2019 16:54होमपेज › Belgaon › सेंद्रिय भाजीपाल्याला शहरात वाढती मागणी

सेंद्रिय भाजीपाल्याला शहरात वाढती मागणी

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 9:15PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

टिळकवाडीत सेंंद्रिय खतावरील उत्पादित भाजीपाल्याची बाजारपेठ नागरिकांचे लक्ष वेधनू घेत असून दिवसेंदिवस मागणी वाढती आहे. नागरिक बाजारपेठेतून जे अन्नधान्य किंवा भाजीपाला खरेदी करतात तो हायब्रीड असतो. जे शेतकरी सेंद्रीय भाजीपाल्याचे उत्पादन घेतात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तो पुरवठा करायचा. शेतकर्‍यांच्या संमतीनुसार वेणुग्राम सेंद्रीय भाजीपाला बाजारपेठ अभय मुतालिक-देसाई यांनी कलामंदिरजवळील घराच्या आवारात सुरू केली आहे. ही बाजारपेठ सोमवारी व गुरुवारी सायं. 5 ते रात्री 9 वा. पर्यंत सुरू असते.

खरेदीदार  व उत्पादक शेतकरी मोबाईलद्वारे अभय देसाई यांच्याशी संर्पक साधू शकतात. व्हॉटस् अ‍ॅपवरही त्यांनी तीन गट निर्माण केले आहेत.   या गटामध्ये 600 ग्राहकांचा व 25 सेंद्रीय भाजीपाल्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांचा समावेश आहे. या शेतकर्‍यांनी उत्पादित भाजीपाल्याविषयी अमेरिका व युरोपमधून प्रमाणपत्रे मिळविली आहेत. ते शेतकरी आपल्या 110 एकरमध्ये भाजीपाल्याचे व फळांचे उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतात. ग्राहकांनी ऑर्डर एक दिवस आधी बाजारपेठेत नोंद केली पाहिजे. रविवारी व बुधवारी कोणत्या प्रकारचा भाजीपाला किती प्रमाणात पाहिजे ते सांगायचे. दुसर्‍या दिवशी ग्राहकाला सकाळी तो  संबंधित शेतकरी पुरवठा करतो. भाजीपाला पिशव्यामधून पॅक केला जातो. त्या बॅगवर खरेदीदार ग्राहकाचे नावही लिहिले जाते.  भाजीपाल्याची बॅग देताना ग्राहकासमोर वजन केले जाते. ज्यांचा व्हॉटस्अ‍ॅप गटामध्ये समावेश नाही ते नागरिकही भाजीपाला खरेदी करू शकतात.

बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रति किलो  40 रु. दर आहे. या बाजारपेठेतील दर बदलत नाहीत. सध्या हायब्रीड भेंडीचा दर बेळगाव बाजारपेठेत प्रतिकिलो 80 रु. असला तरी सेेंद्रीय बाजारपेठेत मात्र तो 40 रु. ठेवलेला आहे. नागरिक तांदूळ, ज्वारी, गहू, हळद, बिन्स व फळे खरेदी करू शकतात. अभय  देसाई हे शेतकर्‍यांकडून कोणत्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे त्याची चौकशी करतात. त्याप्रमाणे ते शेतकरी आपल्या उत्पादनाबद्दल व्हॉटस्अ‍ॅपवर माहिती देतात. त्याप्रमाणे नागरिक खरेदीसाठी मागणी नोंदवतात. नागरिकांकडून या भाजीपाला बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमची बाजारपेठ नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. शेतकर्‍यांनीही आपले लक्ष सेंद्रीय उत्पादनाकडे वळविले आहे. रासायनिक खतावर उत्पादित केलेल्या भाजीपाला आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. परंतु सेंंद्रीय भाजीपाल्याच्या व अन्नधान्याच्या वापरामुळे आरोग्य सुधारू शकते, असे अभय मुतालिक यांनी सांगितले.