Sun, Jul 21, 2019 12:20होमपेज › Belgaon › शाळांची शंभरी; दर्जा हवा ‘नंबरी’

शाळांची शंभरी; दर्जा हवा ‘नंबरी’

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 11 2017 8:18PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील दोन प्राथमिक मराठी शाळांचा शतकमहोत्सव या महिन्यात होत आहे. एकीकडे शाळा  शंभरीचा टप्पा गाठत असताना घटत्या पटसंख्येमुळे शाळांचे अस्तित्व धोक्यात आहे. अशी स्थिती तालुक्यातील अनेक गावातील  मराठी शाळांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मराठी भाषिकांनी जागे होण्याची गरज असून ‘उत्सव’ नको ‘उत्कर्ष’ करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे.  यामुळे सीमालढ्यासह मराठीच्या प्रत्येक लढ्यात हा भाग अग्रेसर असतो. या भागातील आंबेवाडी प्राथमिक शाळेचा शतकमहोत्सव नुकताच पार पडला. येत्या 23, 24 रोजी कुद्रेमानी प्राथमिक शाळेचा शतकमहोत्सव साजरा होणार आहे.

हे कार्यक्रम गावच्या एकीतून साजरे होत आहेत. या माध्यमातून  शाळेचे नूतनीकरण, रंगरंगोटी, सुविधा, कार्यक्रम, मनोरंजन, सत्कार असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी संपूर्ण गाव एकवटत आहे. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. हे होत असताना शाळांना भेडसावणार्‍या समस्यांचा कानोसा घेऊन उपाययोजना आखण्याची गरज आहे. मराठी शाळांवर  एकीकडे कानडीचा वरवंटा सुरू आहे. यातून मराठी शाळा बंद पाडण्याचे कारस्थान जोमात आहे. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आक्रमणामुळे मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात आहे. यामुळे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 

मराठी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा पूर्वी असणारा ओढा  कमी झाला आहे. याला सरकारचा दुस्वास, पालकांचे धोरण व शिक्षकांची अनास्था कारणीभूत आहे. परिणामी नाईलाजास्तव पाल्याच्या भवितव्यासाठी पालकांना अन्य माध्यमाकडे वळावे लागत आहे. यासाठी मराठी भाषिकांनी सजग होण्याची गरज आहे. गावातील मराठी शाळांचे अस्तित्व संपल्यास त्याचा धक्का भाषेला बसतो. भाषा संपल्यास संस्कृती लयाला जाते. मराठी शाळा वाचविण्याची गावोगावी मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी दर्जेदार शिक्षण, सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. यासाठी लोकवर्गणीतून निधी उभारल्यास शतकमहोत्सव केवळ उत्सवी न होता, मराठी शाळांना दिलासा देणारा ठरेल. संमेलनात शाळा वाचविण्यासंदर्भातील व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद आणि मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. देणगीदारांच्या सत्काराबरोबरच भवितव्याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.