Tue, Mar 26, 2019 08:16होमपेज › Belgaon › सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी धमकी  

सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी धमकी  

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी  

ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी कडोली येथील काही जणांकडून ठार मारण्याची धमकी देण्यात येत असून आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी कडोली प्रभाग 1 च्या सदस्या सुप्रिया लक्ष्मीकांत म्यागेरी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. म्यागेरींनी निवेदनात म्हटले आहे की, ग्रा.पं.च्या 2015 मधील निवडणुकीत प्रभाग 1 मधून निवडून आले आहे. सदस्या या नात्याने जनतेची कामे करीत आहे. ग्रामपंचायतीच्या योजनेतून परिशिष्ट जातीतील नागरिकांसाठी कूपनलिकेच्या पाण्यासाठी विद्युत मोटार, आमदार निधीतून दिव्यांगाना तिचाकी वाहने उपलब्ध करून दिली. समुदाय भवन उभारण्यासाठी 12 लाखांचे अनुदान मंजूर करून आणले आहे. जुने समुदाय भवन पाडून नवे उभारण्यासाठी ग्रामस्थांची अनेकदा बैठक घेऊन ठराव केला. यानंतर नवे  भवन उभारण्यासाठी प्रत्येक घरातील दोन सदस्यांची सह्यानिशी संमती मिळवून  ग्रा.पं.ला निवेदन दाखल केले.

छ. शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना व त्यानंतरच्या काळात बेळगाव येथे विधिमंडळ अधिवेशनामुळे भवन बांधकामाला सुरुवात करण्यास विलंब झाला. लवकरच कामाला सुरुवात करू, असे आंबेडकर गल्लीतील नागरिकांना सांगण्यासाठी गेले.  मला व कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. काकती पोलिसांत आमच्याविरुध्द खोटी तक्रारही करण्यात आली आहे. सदस्यत्व रद्द करण्यासाठी यल्लाप्पा मेत्री, यल्लप्पा कोलकार, रमेश शिरगुप्पीकर, विजय कोडे, परशुराम कोलकार, सुखदेव मेत्री, गणपत हणमंतनवर,  सुरेश कोलकार आदींनी दबाव आणला आहे. सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीकडे निवेदने पाठविली आहेत. 2015 मधील निवडणुकीत यल्लाप्पा मेत्री यांची पत्नी सुनीता प्रभाग 1 मधून पराभूत झाल्या. माझा विजय पचनी न पडल्याने मेत्री यांनी सूडाचे राजकारण चालविले आहे, असे निवेदनात नमूद आहे.