Wed, Mar 20, 2019 12:48होमपेज › Belgaon › शब्दगंधाने दरवळणार्‍या बागेतल्या कविता

शब्दगंधाने दरवळणार्‍या बागेतल्या कविता

Published On: Dec 30 2017 12:34AM | Last Updated: Dec 29 2017 9:06PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

मराठी काव्यसृष्टीत बेळगाव परिसराने स्वतंत्र असा ठसा उमटविला आहे. येथील कविंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर बेळगावचे नाव अजरामर केले आहे. अशा बेळगाव नगरीतील वेगवेगळ्या सार्वजनिक उद्यानात मागील दहा महिन्यापासून बागेतल्या कवितांचे शब्द घुमत असून त्याचा सुगंध काव्यरसिकांना वेडावून सोडत आहे. या उपक्रमातील दहावा कार्यक्रम   शनिवार दि. 30 रोजी दु. 4 वा.  रिमंदिरासमोरील महांतेश उद्यानात होणार आहे. यानिमित्त बेळगाव शहर आणि परिसरातील कवी एकत्र काव्यजागर करणार आहेत. हा काव्य जागराचा उपक्रम वर्षपूर्तीकडे वाटचाल करत आहे.
मराठी साहित्यक्षेत्राला बेळगाव म्हटले की, इंदिरा संत, कृ. ब. निकुम्ब, शंकर रामाणी या दिग्गज कविंची आठवण येते. त्यांनी आपल्या काव्यातून अजरामर अशा कवितांची निर्मिती केली. कवितेतून त्यांच्या प्रतिभेची झेप दिसून येते. 

च्यानंतर बेळगाव शहरातील कविता जागती ठेवण्याचे काम    शब्दगंध कविमंडळाकडून झाले. त्याठिकाणी बेळगाव शहर परिसरातील कवींनी हजेरी लावून आपली कविता जपण्याचे काम केले. कविंना घडविण्याचे  काम शब्दगंधने केले.  मात्र अलीकडच्या काळात खेड्यापाड्यात झालेल्या शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि  साहित्य संमेलनांच्या चळवळीमुळे अनेकजण लिहू लागले. त्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळत नव्हती. त्यांना व्यासपीठ देण्याचे काम एल्गार साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले. त्याला साथ देण्याचे काम शब्दगंध कविमंडळाने केले. एल्गार सामाजिक पषिदेच्या बेळगाव शाखेतर्फे फेब्रुवारी महिन्यात पहिला उपक्रम कँम्प येथील मिलिट्री महादेव मंदिराच्या बागेत पार पडला.

पहिल्याच उपक्रमाला तब्बल 50 हून अधिक कविंनी हजेरी लावली. या उपक्रमात आजवर बेळगाव, खानापूर, चंदगड, सावंतवाडी, गोवा, नाशिक परिसरातील कविंनी सहभाग घेऊन दर्जेदार कवितांंचे सादरीकरण केले आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी अनेक कवी शहरातील एका बागेत येऊन आपल्या कविता सादर करतात. यामध्ये नवोदित कविंचा अधिक भरणा असतो.  त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबर ज्येष्ठ कविंचा सत्कार करण्याचा  पराक्रम  राबविण्यात येत आहे. आजवर डॉ. चंद्रकांत पोतदार, अभिनेते व कवी प्रसाद पंडित, संजय बरगावकर, वि. गो. वडेर, नारायण किल्लेकर आदींनी मार्गदर्शन केले आहे. यामुळे ही कवितेंची बाग दिवसेंदिवस अधिक तजेलदार बनत चालली आहे.

कवींना व्यासपीठ देण्यासाठी बागेतल्या कवितांचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यातून चांगला प्रतिसाद लाभत असून वर्षपूर्तीनिमित प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित केला जाणार आहे.
- प्रा. अशोक अलगोंडी संयोजक


या उपक्रमातून अनेक जुने-नवे कवी नव्याने सक्रिय झाले आहेत. नव्या विषयावर सशक्तपणे लिखाण होत असून त्यातून चांगल्या दर्जाचे कवी उपक्राम सहभागी होत आहेत. हा उपक्रम कविसाठी उपकारक ठरला आहे. - निळूभाऊ नार्वेकर संयोजक