Tue, Apr 23, 2019 08:06होमपेज › Belgaon › ‘कचरामुक्त हिंडलगा’ योजना बासनात 

‘कचरामुक्त हिंडलगा’ योजना बासनात 

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:43PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

महानगरपालिका कार्यक्षेत्राला लागून असणार्‍या हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कचरा समस्या जटिल झाली आहे. गेल्या वर्षी कचरामुक्त हिंडलग्याची घोषणा हवेत विरून गेली असून रस्त्याच्या बाजूला कचर्‍यांचे ढीग पडले आहेत. यामुळे ‘स्वच्छ भारत’ अभियानाची याठिकाणी ऐशीतैशी झाली आहे. परिणामी गावच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हिंडलगा कार्यक्षेत्र फार मोठे आहे. यामुळे कोणतीही योजना राबविताना ग्रा. पं. ला चांगलीच कसरत करावी लागते. यामध्ये वाढत्या कचर्‍याच्या समस्येची भर पडली आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव तालुक्यात सर्वाधिक कार्यक्षेत्र हिंडलगा ग्रा. पं. मध्ये आहे. बेळगाव शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या भागात उपनगरे वाढत आहेत. त्या प्रमाणात नागरी समस्यादेखील निर्माण होत आहे. यावर नियंत्रण ठेवताना ग्रा. पं. ला कसरत करावी लागत आहे.

गावातून जाणार्‍या बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या दुतर्फा कचर्‍याचे ढीग पडलेले दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक कचरा अधिक प्रमाणात दिसून येतो. या भागात असणार्‍या दुकानदाराकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येतो. त्या पिशव्या वापरल्यानंतर टाकून देण्यात येतात. यामुळे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचून राहिले आहेत. ग्रा. पं. ने मागील वर्षी कचरा हटाव मोहीम सुरू केली होती. रस्त्यावर कचरा टाकणार्‍याला 500 रु. दंड आकारण्याचे फलक जागोजागी लावले होते. गावात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा दिला होता. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु, सध्या ग्रा. पं. ला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असून दंड वसुलीदेखील गायब झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचून राहिले आहेत. परिणामी उपनगरात डुकरांचा उपद्रव वाढला आहे. 

सदर ग्रा. पं. ला ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वीपणे राबविल्याबद्दल  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. सध्या कचर्‍याची समस्या गंभीर बनली असून हा कचरा हटविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला होता. परंतु, देखरेखीअभावी हा ट्रॅक्टर सध्या बंद अवस्थेत असून तो शोभेची वस्तू बनून राहिला आहे.