Thu, Jul 16, 2020 09:40होमपेज › Belgaon › भविष्य निर्वाह निधी पेन्शन किमान 3 ते 9 हजार रुपये द्या

भविष्य निर्वाह निधी पेन्शन किमान 3 ते 9 हजार रुपये द्या

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 11 2017 9:01PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

भविष्य निर्वाह निधी पेन्शन किमान 3 हजार ते नऊ हजार रुपये देण्यात यावी, या मागणीसाठी 21 फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’  अभियानाचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भविष्य निर्वाह निधी पेन्शन फेडरेशनचे अध्यक्ष आर. पी. कोपर्डे होते. कर्नाटकात पाच लाखापेक्षा जास्त पेन्शनधारक आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश पेन्शनधारकांना मासिक 60 रुपयापासून ते 400 पर्यंत पेन्शन देण्यात येते. काँग्रेस सत्तेवर असताना किमान पेन्शन एक हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू तो अमलात आणला नाही. केंद्र सरकार देशामध्ये महागाई भत्ता जाहीर करते तो भत्ता सहा महिन्यातून एकदा पेन्शनधारकांना मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.

देशातील पेन्शनधारकांच्या समस्या दूर करून त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी संसदेमध्येही चर्चा झाली आहे. संसदेच्या शिफारशीनुसार एका कमिटीची स्थापना करण्यात आली. अ. भा. समन्वय कमिटीने पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन देण्यात यावी, अशी शिफारसही केलेली आहे. याच्या पृष्ट्यर्थ 21 फेब्रुवारी रोजी कमिटीच्यावतीने संसदेसमोर धरणे आंदोलन, बेमुदत सत्याग्रह हाती घेण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी करण्यासाठी 16 डिसेंबर रोजी बोंडाली (जि. मंगळूर) येथे बैठक बोलावली आहे. दिल्लीतील आंदोलनामध्ये राष्ट्रीय पातळीवरील पेन्शनधारक हजारोंच्या संख्येने भाग घेणार असल्याचे फेडरेशनचे कार्यवाह एस. एस. महाजन यांनी सांगितले. बैठकीला बेळगाव जिल्ह्यातील पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.