Wed, Jul 24, 2019 05:46होमपेज › Belgaon › हमी भावासाठी शेतकर्‍यांचा हलगी मोर्चा

हमी भावासाठी शेतकर्‍यांचा हलगी मोर्चा

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:59PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

कृषिमालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी अनेकवेळा करूनही सरकारकने दुर्लक्षच केले. पिकाच्या खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल रयत संघटनेने जिल्हा प्रशासनावर हलगी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. राज्यामध्ये चार वर्षापासून शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला आहे. चार वर्षापासून हमी भाव देण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. काबाडकष्ट करून पिकविलेल्या पिकाची कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

काबाडकष्टासाठीच शेतकर्‍यांचा जन्म झाला आहे का, असा सवाल उपस्थित करून मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी करुन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन केले. सुगीचा हंगाम असून भात, नाचणा, मका, तूर, भुईमूग, कापूस, उडीद, बाजरी, मिरची पिकांचे शेतकर्‍यांनी उत्पादन घेतले आहे. याची दलालांकडून कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. प्रशासनाने योग्य भाव जाहीर करून खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. 

पिकांना त्वरित हमीभाव जाहीर करण्यात यावा, खरेदी केंद्रे सुरू करावीत. अतिवृष्टी आणि दुष्काळाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई त्वरित द्यावी. केंद्र सरकारच्या स्वामिनाथन अहवालाची  मलबजावणी करावी. उसाला एसएपी भाव जाहीर करावा. कारखान्यांकडील थकबाकी देण्यात यावी. शेतकर्‍यांसाठी आवश्यक व मंजूर करण्यात आलेल्या पाणी उपसा योजना त्वरित पूर्ण कराव्यात, नंदीकुरळी येथील क्रशन मशीन बंद करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. जिल्हा पालकमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनही कोणतीच कार्यवाही केली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकमंत्र्यांचा निषेध केला. कर्नाटक राज्य रयत संघटना व हसिरू सेना यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष राघवेंद्र नाईक, चोनाप्पा पुजारी, गणपती इळीगेरी, भीमसी गडादी, अशोक यमकनमर्डी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी चन्नम्मा चौकात मानवसाखळी करून आंदोलन करण्यात आले.