बेळगाव : प्रतिनिधी
मार्कंडेय नदीत वर्षानुवर्षे साठत आलेला गाळ आणि आसपासच्या शेतकर्यांनी नदीपात्रात अतिक्रमण केले आहे. यामुळे नदी पात्राची यापूर्वीची असलेली खोली कमी होत चाललेली आहे. यासाठीच नदीकाठावरील ग्रा. पं. कडून रोहयो योजनेंतर्गत नदीपात्रातील गाळ काढण्यात आला असला तरी त्याचा कोणताच उपयोग झालेला नाही. नदीचे पात्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने नदी काठावरील व संबंधित ग्रा.पं.च्या हद्दीत येणार्या भागात रोहयो योजनंतर्गत गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये उचगाव, आंबेवाडी, हिंडलगा, गोजगा, मण्णूर, कंग्राळी खुर्द, जाफरवाडी, कडोली आदी ग्रा. पं. च्या हद्दीत येणार्या नदीमधील साठलेला गाळ काढण्याचे काम वर्षभरापूर्वी करण्यात आले आहे.
याला जि. पं. कडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र काढण्यात आलेला गाळ नदी काठावरच टाकण्यात आला असल्याने सदर योजना कूचकामी ठरली आहे. पावसाळ्यामध्ये सदर टाकण्यात आलेला गाळ पुन्हा नदीपात्रात मिळाला असल्याने नदीपात्राची खोदाई करून कोणताच उपयोग झाला नसल्याच्या प्रतिक्रिया जाणकारांतून व्यक्त करण्यात येत आहेत. शासनाकडून नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात असले तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. यासाठी ठोस नियोजन करून नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
शहरापासून जवळ असणार्या कंग्राळी खुर्द, हिंडलगा, कंग्राळी बीके, होनगा, काकती आदी गावांचा मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला आहे.
या गावांच्या व्याप्तीत अनेक उपनगरे उदयास आली आहेत. सदर उपनगरे महानगर पालिकेच्या व्याप्तीत असली तरी सांडपाणी मात्र ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणार्या नदीपात्रात सोडले जात आहे. यावरही संबंधित ग्रा. पं. ने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. ग्रा. पं. च्या व्याप्तीतून थेट नदीला सांडपाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रदूषणाला या गोष्टीही कारणीभूत ठरत आहेत. याबाबत ग्रा. पं. ने महापालिकेच्या व्याप्तीत येणार्या उपनगरांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला सूचित केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित
नदीकाठावर असणार्या ग्रा.पं. च्या हद्दीतील सांडपाणी नदीला सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित होत आहे. यासाठी ग्रा. पं. नी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरालगतच्या गावांचा विकास होत आहे. त्यामुळे शहरापासून जवळ असणार्या गावांचा विस्तार वाढत आहे. परिणामी या परिसरातील सांडपाणी नदीला मिळत असल्याने याचा परिणामही नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे.