Tue, May 21, 2019 23:05होमपेज › Belgaon › कौटुंबिक संघर्ष जीवघेण्या दिशेकडे

कौटुंबिक संघर्ष जीवघेण्या दिशेकडे

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 10:21PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात काही दिवसात घडलेल्या धक्कादायक घटनांनी नागरिक धास्तावले आहेत. आई-वडिलांनी अभ्यासासाठी रागवल्याच्या कारणास्तव एका मुलाने आत्महत्या केली. पदवीधर मुलाने मालमत्तेच्या वादातून बापाचाच खून केला. वंटमुरी कॉलनी येथे मोठ्या भावाने समज दिल्याबद्दल छोट्या भावानेच त्याचा काटा काढला.  या तीन  घटनांतून नव्या आणि जुन्यापिढीतील वैचारिक संघर्ष टोकाला पोहोचल्याची लक्षणे स्पष्ट होत आहेत. 

एका मुलाने आई-वडिलांच्या रागातून आत्महत्या केली. या उलट अंजनेयनगर येथे एका नराधम मुलाने स्वत:च्या बापाचीच हत्या केली. डॉ. उमाकांत दंडावतीमठ यांचा एकुलता  मुलगा रवि याने डॉ. उमाकांत यांचा थंड डोक्याने खून केला. डॉ. उमाकांत यांच्या पत्नीचे 18 वर्षांपूर्वी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर उमाकांत यांनी मुलाच्या संगोपनात कोणतीही कसर ठेवली नव्हती. मुलगा डॉक्टर बनावा, यासाठी त्यांनी रवीला वैद्यकीय महाविद्यालयातही प्रवेश मिळवूून दिला होता. 

वय वाढत असतानाही बाप काम करीत होता. पण त्यांचा मुलगा रवी शिक्षणाऐवजी ऐशोआरामी जीवन जगत होता. रवीची पत्नीही वैद्यकीय पदवीधर आहे. रवी  बापाच्या मालमत्तेसाठी सतत भांडत होता. याच वादातून रवीने 2 फेब्रुवारीला रात्री बापाच्या डोक्यात सळीचा वार करून खून केला. खून केल्यानंतर रवी चित्रपट पाहायला गेला. मात्र हत्येने बिथरलेला रवी काही वेळानंतर बहिणीच्या घरी गेला. त्याने बहिणीला चोरट्यांनी वडिलांचा खून केल्याची बतावणी केली. 

उमाकांत यांची मुलगी बापाच्या खुनाच्या माहितीने धास्तावली. भावासोबत ती माहेरी आली. तेथे उमाकांत रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झाल्याचे दिसले. काम कर असे मोठ्या भावाने सांगितल्याने लहान भावाने त्याच्या डोक्यात वरवंटा घातला. लहानशी गोष्ट, पण त्यातून एक जीव गेला. रामतीर्थनगर येथे राहणारे लोकेश व संतोष सानिकोप या भावांतील क्षुल्‍लक कारणावरूनचा वाद विकोपाला गेला. मोठा भाऊ लोकेश आपल्या लहान भावाला रिकामेटेकडा राहण्यापेक्षा काम कर असे सांगत  असे. 20 जानेवारीला दुपारी या भावांत रिकामटेकडेपणावरून वाद उद्भवला.

त्यावेळी रागाच्या भरात संतोषने लोकेशच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला. मोठा भाऊ रक्‍तबंबाळ झाल्याचे पाहिल्यानंतर संतोष तेथून ऩि़घून गेला.सायंकाळी त्यांची आई कामावरून परतल्यानंतर घरातील प्रकार उघडकीस आला. कौटुंबिक संघर्ष जीवावर बेतू लागले आहेत. अशाच प्रकारच्या अनेक घटनांनी बेळगावकारांची झोप उडाली आहे.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही विविध दबाव वाढत आहेत. यातूनच पालक आणि विद्यार्थ्यांत किरकोळ कारणावरून निर्माण होणारे वाद विकोपाला जात आहेत, अशावेळी पालकांची जबाबदारी वाढली आहे. अपेक्षांचे ओझे लादण्याऐवजी पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद घडत राहणे आवश्यक आहे. मुलांमधील न्यूनगंड आणि निराशेची भावना दूर करण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षकांनीही प्रयत्न करावेत.

- महादेव कडंगले, मराठी प्राथ. शाळा मुख्याध्यापक

स्वीकारला आत्महत्येचा मार्ग

भवानीनगर येथील शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. मुलाला शाळेतही चांगल्या वागणुकीची सातत्याने ताकीद दिली जात होती. आई-वडीलही आपल्या मुलाला अभ्यासासाठी सातत्याने सांगत असत. मात्र त्या कोवळ्या वयातील मुलाने शिक्षक आणि पालकांचा चांगला सल्ला मान्य करण्याऐवजी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.