Tue, Mar 19, 2019 20:49होमपेज › Belgaon › निवडणुकीच्या तोंडावर सरकारला जाग

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला जाग

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 8:17PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

आपल्याच कष्टाच्या उसाच्या बिलासाठी शेतकर्‍यांना अहोरात्र आंदोलन करावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून थकित बिलाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांनी अखेर आंदोलनास्त्र उपसल्यानंतरच कारखान्यांकडील बिले देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आगामी निवडणुका पाहून  मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप शेतकरी नेते करीत आहेत. राजकीय पक्षांकडून शेतकर्‍यांचा केवळ ‘व्होट बँक’ म्हणून उपयोग करून घेतला जात आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न कोणत्याच पक्षाने केलेला नाही, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. 

सहा   वर्षांपासून   शेतकर्‍यांनी थकित बिलासाठी अनेकदा पाठपुरावा केला.  मात्र सरकार दरबारी दखल घेतलेली नाही. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळात असणार्‍या अनेक मंत्र्यांचेच कारखाने आहेत. यापूर्वी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नाही. अधिवेशन काळात सुवर्णसौंध परिसरात शेतकर्‍यांनी उसाला हमी भाव द्यावा व कारखान्यांकडे असणारे थकित बिल द्यावे, यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. बेळगाव भेटीवर मुख्यमंत्र्यांनी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला उसाचे बिल वसूल करून देण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. कर्जबाजारीपणामुळे राज्यात तीन वर्षांत 3 हजारपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. सरकारला शेतकर्‍यांच्या समस्यांची जाणीव झाली नाही का, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला आहे. 

अशीच भूमिका भाजप नेत्यांनीही घेतली. म्हादई पाणीपुरवठा योजनेसंदर्भात शेतकर्‍यांनी दोन वर्षांपासून आंदोलन केले असले तरी त्याची दखल घेतली नाही. आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने गोवा सरकारशी चर्चा करून समस्या निवारणासाठी गोवा सरकारला राजी केले. यामध्येही राजकारण न करता प्रश्‍न सोडविण्याला महत्त्व द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते कुरबूर शांतकुमार यांनी केली आहे.