Fri, Apr 19, 2019 12:32होमपेज › Belgaon › फुटपाथवरही अतिक्रमणाचा विळखा

फुटपाथवरही अतिक्रमणाचा विळखा

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 8:07PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराची स्मार्टसिटीत निवड होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला तरीदेखील बेळगाव स्मार्ट होताना दिसत नाही. स्मार्ट शहरात ट्रॅफिकच्या समस्येबरोबर फुटपाथ वरही  अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसून येत आहे. रहदारी विभाग व महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा फटका पादचार्‍यांना सहन करावा लागत आहे. फुटपाथवर दुचाकी, चारचाकी वाहने लावण्यात येत आहेत. यामुळे पादचार्‍यांना फुटपाथ ओलांडताना अडथळे येत आहे. परिणामी रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. यामुळे अपघात होण्याची धोका निर्माण झाला आहे. 

शहरात बहुसंख्य फुटपाथवर दुकाने-टपर्‍यांची अतिक्रमणे आहेत. फेरीवाले, दुचाकी, चारचाकी, हातगाड्यांनी फुटपाथ व्यापले आहेत. पालिकेने शेकडो वेळा कारवाई केली तरी कारवाईनंतर काही तासांतच तिथे पुन्हा फेरीवाल्यांची पथारी पडणार हे निश्‍चित आहे. फेरीवाले आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात जणू करारच झाला असावा, असा हा खेळ वर्षानुवर्षे सुरु आहे. फुटपाथवरील अतिक्रमणामळे बेळगावकर हैराण झाले आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर अवैध पार्किंगही सुरू आहे. शहरातील फुटपाथची अवस्था ही अतिशय विदारक आहे. फुटपाथवरून चालताना अतिक्रमणामुळे रस्त्यावर उतरावे लागते. मध्येच वाहतुकीची कोंडी होते.  त्यामुळे हे फुटपाथ मोकळे केव्हा होणार, असा प्रश्‍न शहरवासीयांना सतावत आहे. 

फुटपाथ आपल्यासाठी खरंच असतात का,  असा प्रश्‍न बेळगावकरांना कायम पडतो. अतिक्रमण, भिकारी, कचरा कायम फूटपाथवर असतो. यामुळे मनपा व पोलिस विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.  शहरातील कुठल्याही फुटपाथवर अनधिकृत फेरीवाले बसू नयेत, याची जबाबदारी बेळगाव मनपा तसेच पोलिसांचीही आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करणार्‍या पालिकेबरोबरच नागरिकांना त्रास देणार्‍या कमलाखाली पोलिस या अतिक्रमण करणार्‍यावर कारवाई करू शकतात. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.