Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Belgaon › बेळगाव ड्रग्जचे इंटरनॅशनल कनेक्शन

बेळगाव ड्रग्जचे इंटरनॅशनल कनेक्शन

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 7:44PM

बुकमार्क करा
बेळगाव : श्रीकांत काकतीकर

बेळगावात अधूनमधून अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिस कारवाईचा फार्स सुरू असतो. प्रत्यक्षात महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले बेळगाव कुख्यात्य गुन्हेगारांबरोबरच ड्रग्ज माफियांसाठी सुरक्षित स्थान बनले आहे. 2007 साली शहरात उघड झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जमाफिया प्रकरणाची पाळेमुळे परदेशापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले होते. यानंतरही देशाच्या विविध भागातून शहरात अमली पदार्थांची रेलचेल कायम आहे.

2007 साली ड्रग्जमाफिया प्रकरणात आकाश देसाई या नावाने खळबळ निर्माण केली. टिळकवाडी पोलिसांना निनावी फोनव्दारे एका बंगल्यातील संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती. त्यावेळच्या पोलिस अधिकार्‍यांनाही निनावी फोनव्दारे मिळालेल्या माहितीची शहनिशा करण्यासाठी जाताना एका आंतराष्ट्रीय माफिया प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची कल्पना नव्हती.
टिळकवाडी पोलिसांनी चन्नम्मानगर व हिंदवाडी येथील बंगल्याची झडती घेण्याचे काम केले. त्यावेळी कोट्यवधी रुपयांचे मारीजुवा व हशीश त्या बंगल्यात सापडले. कारवाईसाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यालाही प्रथमत: हाती लागलेल्या नशिल्या पदार्थांच्या किमतीचा अंदाज आला नाही.

तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख हेमंत निंबाळकर यांना ज्यावेळी टिळकवाडी पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाली, यावेळी त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. निंबाळकर यांना आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया प्रकरणाचा शहरात पर्दाफाश झाल्याच्या माहितीने हादरवून सोडले. 2007 साली बेळगावात उघड झालेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आकाश देसाईचे नाव पुढे आले.आकाशसह अन्य चौघांना त्यावेळी अटक करण्यात आली. आकाश आणि त्याच्या साथीदारांकडून कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथून नेपाळच्या डांग जिल्यातून दिल्ली, गोवामार्गे माराजुवाना, हशीश व अन्य अमली पदार्थ बेळगावला पाठविले जात असत.

नेपाळ येथून ते ड्रग्ज बेळगावला आणण्याच्या कामासाठी दोघे काम करत होते. गोव्यात आलेला माल बेळगावला व पुढे परदेशात पाठविण्याच्या कामात गोव्याचा सज्जन गुंतला होता. परदेशातून बेळगावात आलेले ड्रग्ज पुन्हा परदेशात पाठवण्यासाठी आकाश आणि त्याच्या साथीदारांनी फिल्मीस्टाईल फंडा वापरला होता. बेळगावात आणण्यात येणार्‍या ड्रग्जची पाकिटे फोटोफ्रेममध्ये दडवण्यात येत असत. फोटोफ्रेमवर कार्बनफिल्मचे वेस्टन लावले जात असे. त्यावर परदेशात फोटोफ्रेम पाठवल्या जात असल्याचे आकर्षक पॅकिंंग होत असे.

धातुशोधक यंत्राला कार्बनफिल्ममुळे फोटोफ्रेममध्ये घातलेल्या अमली पाकिटांचा सुगावाच लागत नसे. हा सारा प्रकार गुमनामपणे सुरू होता. बेळगावातील फोटोफ्रेममधून युरोप, द. आफ्रिका, मलेशिया व आखाती देशात मारीजुआना, हशीश व अन्य अमली पदार्थाची तस्करी केली जात असे. यातून आकाश व त्याच्या साथीदारांनी गडगंज कमाई केली. आकाशकडे 45 लाखांची कार तर 18 लाख रुपयांची दुचाकी पोलिसांना सापडली. या ड्रग्जमाफिया प्रकरणात 2007 सालची कारवाई सर्वात मोठी धक्कादायक घटना मानली गेली.