Fri, Jul 19, 2019 20:35होमपेज › Belgaon › बेळगावच्या वाहनचालकाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय

बेळगावच्या वाहनचालकाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 8:45PMबेळगाव  : प्रतिनिधी

रस्ता अपघातात मृत्यू झाला किंवा जखमी झाल्यानंतर संबंधितांना दुर्लक्षाचे कारण देत विमा नाकारता येत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी बेळगावातील वाहनचालकाला न्याय मिळाला आहे.

आठ वर्षांपूर्वी बेळगावनजीक अपघात झाला होता. त्यामध्ये चालकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी विम्याची रक्‍कम मिळण्यासाठी कंपनीकडे धावाधाव सुरू केली. मात्र, चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचे कारण सांगून कंपनीने उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्यावेळी कंपनीच्या बाजूने निकाल देण्यात आला. 

याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने कंपनीला चांगलेच फटकारले. याआधी बेळगावातील वाहन अपघात लवादाने दिलेला निकाल उचलून धरला आणि संबंधित चालकाच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश दिले.

प्रकरण काय?

आठ वर्षांपूर्वी बेळगावनजीक झालेल्या अपघातात कारचालक शहाजी शिवाजी दुधाडे ठार झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईसाठी कंपनीकडे मागणी केली. वाहन अपघात लवादाकडे दाद मागण्यात आली. या लवादाने दुधाडे कुटुंबाला 4,60,800 रुपये भरपाई देण्याचा आदेश कंपनीला दिला. मात्र, शहाजी अतिवेगाने कार चालवित होते. दुर्लक्षामुळे त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा दावा कंपनीने करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.