Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Belgaon › ना. हेगडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

ना. हेगडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:21AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी देशाची घटना बदलण्याचे वक्तव्य करून समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या एकतेला बाधा आणण्याचे काम हेगडे यांनी केले आहे. त्यांच्यावर कारवाई करून मंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीतर्फे चन्नम्मा चौकात निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

देशात असलेल्या विविधतेला अनुसरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची एकता कायम राखण्यासाठी घटना लिहिली आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांकडून घटना बदलण्याचे वक्तव्य करून एकतेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.  अनेक भाषा, जाती, धर्माचे नागरिक एकोप्याने राहत असताना केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटना बदलण्यासाठीच देशामध्ये भाजप सत्तेवर आले आहे, असे वक्तव्य करून देशाच्या एकतेला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही विशिष्ट समाजाच्या मतांची आपल्याला गरज नाही, असे वक्तव्य करून वादाला आमंत्रण दिले होते. आता तर घटना बदलण्याचे वक्तव्य करून देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांना केंद्रीय मंत्रिपदावरून हाकलण्यात यावे, अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.  आपल्या राजकीय लाभासाठी असे वक्तव्य करून समाजात अशांतता माजविण्याचा राजकीय नेत्यांकडून सुरू असलेला प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. नेत्यांनी जबाबदारीने वागावे. ना. हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.  तत्पूर्वी चन्नम्मा चौकात  ना. हेगडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात  आले.  यावेळी बेळगाव जिल्हा विनय नावलगट्टी, कार्तिक पाटील, आनंद चोप्रा, सलीम खतीब, नजीर शेख, अशोक अंगडी, संजय लोकापूर, मोहन रेड्डी, युवराज कदम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.