Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Belgaon › जिल्हा विभाजनाला ‘कानडी’ बे्रक

जिल्हा विभाजनाला कानडी बे्रक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  जिल्हा विभाजनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे कानडी संघटनांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असून त्यांनी विभाजन टाळण्याचा खटाटोप चालविला आहे. विभाजन झाल्यास मराठी भाषिकांचे वर्चस्व वाढेल, अशी भीती त्यांना वाटत असून त्यांनी याचा धसका घेतला आहे. जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याला शनिवारी कानडी संघटनांच्या झालेल्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत विभाजन करू नये, अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा विभाजन झाल्यास बेळगाव आणि चिकोडी असे दोन स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात येणार आहेत. त्याठिकाणी मराठी भाषिकांचे वर्चस्व निर्माण होईल. 

स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य ठिकाणी निवडून येणार्‍या मराठी लोकप्रतिनिधींची संख्या वाढेल. परिणामी, त्यांच्याकडून महाराष्ट्रात विलीन होण्याचे ठराव बिनबोभाट संमत होतील, अशी धास्ती कानडी संघटनांना लागून राहिली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या काळात जिल्हा विभाजनाचा निर्णय राज्य सरकारने घेऊ नये, असे मत कानडी संघटनांनी व्यक्त केले आहे.  प्रस्तावित चिकोडी जिल्ह्यात अथणी, चिकोडी, रायबाग, हुकेरी तालुक्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. परिणामी, स्थानिक स्वराज संस्था, पंचायत राज संस्थेत मराठी लोकप्रतिनिधींचे प्राबल्य वाढेल, अशी भीती कानडी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना छळत आहे.

यापूर्वी 1997 साली तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगाव जिल्हा सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असणारा जिल्हा आहे. याठिकाणी विकासकामे राबविताना अधिक निधीची आवश्यकता असते. परिणामी, विभाजन करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. परंतु, त्यामध्ये खोडा घालण्याचे काम कानडी संघटनांनी सातत्याने चालविले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या ताज्या घोषणेमुळे पुन्हा एकदा कानडी संघटनांची वळवळ सुरू झाली आहे. बेळगाव आणि प्रस्तावित चिकोडी जिल्ह्यात कानडी भाषिकांचे वर्चस्व कमी होण्याची व हा भाग महाराष्ट्रात जाण्याची धास्ती त्यांना सतावत आहे.