Fri, Apr 26, 2019 09:40होमपेज › Belgaon › बेळगाव जिल्हा विभाजन मुद्दा ऐरणीवर

बेळगाव जिल्हा विभाजन मुद्दा ऐरणीवर

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 8:57PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी किंवा गोकाकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याचा विचार कर्नाटक सरकार करीत आहे. खुद्द मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून आणखी दोन नवे जिल्हे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे येत्या मार्चपूर्वी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

चिकोडी जिल्हा करण्याच्यादृष्टीने त्या ठिकाणी जिल्हास्तरावरील सर्वच कार्यालये कार्यरत आहेत. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी किंवा गोकाक या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न 1995 पासून सुरू करण्यात आला आहे. परंतु मध्यंतरी राजकीय इच्छाशक्तीअभावी नव्या जिल्ह्यांची निर्मिती खोळंबली होती. परंतु आता मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी व गोकाक अशा एकूण 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी प्रशासकीय कामकाजासाठी व सरकारी विकास योजना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करणे हे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व जिल्हा सरकारी कार्यालयांचे कामकाज गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मार्चपूर्वी चिकोडी जिल्ह्याची निर्मिती झाली तर आश्‍चर्य वाटणार नाही. त्यासाठी खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी व निपाणीच्या आ. शशिकला जोल्ले कार्यरत आहेत. चिकोडी जिल्ह्यामध्ये अथणी, रायबाग, निपाणी व कागवाड आदी भाग समाविष्ट करून चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

चिकोडी जिल्ह्याच्या निर्मितीप्रमाणेच आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने माजी मंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आरभावीचे आ. भालचंद्र जारकीहोळी हे स्वतंत्र गोकाक जिल्ह्याच्या निर्मितीसाठी आपली राजकीय शक्ती पणास लावत आहेत. गोकाक तालुक्यातील जनतेसह परिसरातील जनतेने या मागणीसाठी आपला उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला आहे. गोकाक जिल्ह्यामध्ये बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्याचा समावेश करून स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  

या मागणीप्रमाणे चिकोडी व गोकाक या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली तर त्या भागातील जनतेला प्रशासकीय कामकाजामध्ये व सरकारी योजनांचा थेट लाभ घेण्याच्यादृष्टीने सोयीस्कर होणार आहे. केंद्र सरकारकडूनही जिल्हा निर्मितीनंतर ज्यादा निधी मिळण्याचीही शक्यता आहे. ब्रिटिश कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये हुक्केरी व खानापूर तालुक्यांचा समावेश राहणार आहे.