Thu, Aug 22, 2019 10:15



होमपेज › Belgaon › अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्यात 127 हेक्टर पीकहानी 

अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्यात 127 हेक्टर पीकहानी 

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AM



बेळगाव : प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. अतिवृष्टीमुळे शिवारात पाणी साचल्याने जिल्ह्यातील 127.92 हेक्टर क्षेत्रातीप पीक नष्ट झाले आहे. जिल्ह्यात 3525 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कृषी आणि महसूल खात्याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये उपरोक्त बाब स्पष्ट झाली आहे.

जुलै महिन्याच्या मध्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. यामुळे नदीकाठावरील शेतामध्ये पाणी साचले. परिणामी पिके कुजून गेली आहेत. याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत असून शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकर्‍यांना पेरणीचा खर्च पेलावा लागणार आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने संथ हजेरी लावली होती. त्यामुळे पेरणी कामे गतीने झाली. त्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र जुलैच्या मध्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने त्याचा फटका खरीप हंगामाला बसला.

जिल्ह्यातील प्रमुख नद्या भरून वाहत आहेत. कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नद्यामध्ये पाणी अधिक आहे. नदी-नाल्यांतील पाण्याचा फटका 3525 हेक्टर क्षेत्रातील पिकांना बसला आहे. सदर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली असून कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसामध्ये पिके बुडाल्याने 127.92 हेक्टर क्षेत्रातील पिके खराब झाली आहेत.

बेळगाव तालुक्यातील 92 हेक्टर क्षेत्रातील भात पीक पाण्यामुळे कुजले आहे. याठिकाणी दुबार पेरणी करण्याची कसरत शेतकर्‍यांना करावी लागत आहे. अथणी, चिकोडी, हुकेरी तालुक्यातील 2 हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याचा फटका बसला आहे. केळी, पपई, चिक्कू, डाळिंबर आदी बागायती पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील 35 कृषी विभागात समाधानकारक पाऊस झाला आहे. बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, गोकाक तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे या भागात कमी पिकांचे नुकसान झाले आहे. 2015 ते 2018 या तीन वर्षातील खरीप हंगामातील पेरणीचे प्रमाण पाहता यावर्षी समाधानकारक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी अधिकार्‍यांनी दिली आहे.