होमपेज › Belgaon › धारवाड रोड पुलासाठी आणखी दोन महिने

धारवाड रोड पुलासाठी आणखी दोन महिने

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 10:50PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

येथील जुना धारवाड रोड रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उड्डाणपुलावर शनिवारपासून गर्डर घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलावर गर्डर घालण्यासाठी त्याठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहनावर केवळ एकच गर्डर ठेवून घालावा लागत आहे. एकूण 84 गर्डर घालण्यात येणार असून त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे केपीआर कंपनीचे म्हणणे आहे. हे गर्डर घालण्याचे कामकाज पूर्ण केल्यानंतर स्लॅब घालण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी भिंती बांधण्याचेे काम हाती घेण्यात येणार आहे.

या उड्डाणपुलासाठी एकूण 16 कॉलम उभारण्यात आले असून ट्रॉसलबीमही घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या संपूर्ण कामासाठी अद्याप दोन महिन्याचा  कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहरातील नागरिक व वाहनचालकांना रहदारी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.  खास. सुरेश अंगडी यांनी या उड्डाण पुलाचे बांधकाम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी तारीख दिली होती. परंतु प्रत्यक्षात तेथील कामकाज पूर्ण करण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.