Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Belgaon › मुलगी गमाविलेल्या देशात जाणार नाही

मुलगी गमाविलेल्या देशात जाणार नाही

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:15AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावची कन्या सविता हालप्पनवर यांच्या मृत्यूनंतर आयर्लंड सरकारला गर्भपात नियंत्रण कायद्यात बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. या प्रीत्यर्थ आयर्लंडमधील काही संघटना, सामाजिक संस्थांनी सविता यांचे आई-वडील अक्‍कमहादेवी आणि अंदानप्पा याळगी यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. मात्र, मुलगी मगविलेल्या ठिकाणी पुन्हा जायची इच्छा नसल्याचे याळगी दांपत्याने कळविले आहे.

सत्कार करणार्‍या व्यक्‍ती, संघटनांनी याळगी दांपत्याचा येण्या-जाण्याचा, राहण्याचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, तरीही याळगी दांपत्याची त्यासाठी तयारी नाही. अनिवार्यता असतानाही गर्भवती महिलांना आयर्लंडमध्ये गर्भपाताचा निर्णय घेता येत नव्हता. तेथील डॉक्टरांचीही हीच अडचण होती. 28 ऑक्टोबर 2012 रोजी डॉ. सविता यांचा गर्भपान न केल्याने मृत्यू झाला आणि संपूण आयर्लंडसह जगभरात त्याचे पडसाद उमटले. यामुळे तेथील सरकारला कायद्याविरूद्ध मतदान घ्यावे लागले. जनतेने गर्भपाताच्या बाजूने कौल दिला आणि या बदलासाठी कारणीभूत ठरलेल्या सविता यांचे फोटो संपूर्ण आयर्लंडमध्ये झळकले. अजूनही सविताचे फोटो झळकत असून तिला ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय तिच्यामुळेच तेथील महिलांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्‍त होत आहे. 

याविषयी अंदानप्पा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मुलीला भेटल्याच्या शेवटच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी या जगात गर्भपाताविषयीचा जाचक कायदा अस्तित्वात असल्याची साधी कल्पनाही नव्हती. 2012 मध्ये 90 दिवस आयर्लंडचा दौरा केला. सविता गर्भवती असल्याचे समजले. तिला आपल्यासोबत भारतात येण्यास सांगितले. पण, ती वैद्यकीय क्षेत्रात असल्याने तिला तेथील वैद्यकीय सुविधांचे ज्ञान होते. भारतापेक्षा आयर्लंडमध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याचे तिने सांगितले. तिच्यावर विश्‍वास ठेवून परतावे लागले. 23 ऑक्टोबर 2012 रोजी पत्नीसह मायदेशी परतण्यासाठी निघाल्यानंतर सविता आपल्याला विमानतळावर सोडावयास आली होती. तीच शेवटची भेट असल्याचे अंदानप्पा सांगतात. 

25 मे रोजी आयर्लंडमध्ये गर्भपात नियंत्रण कायद्याविरोधात मतदान घेण्यात आले. त्याआधीच्या दोन दिवसांपासून जागृती सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत अंदानप्पा याळगी नियमितपणे आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर नजर ठेवून आहेत. आयर्लंडमध्ये घडलेल्या बदलामुळे केवळ मुलीलाच नव्हे तर तेथील सर्वच महिलांना न्याय मिळाल्याचे ते मानतात.