Wed, Jul 24, 2019 06:35होमपेज › Belgaon › मांसवाढीसाठी ‘निर्बंधित’ औषधांचा वापर?

मांसवाढीसाठी ‘निर्बंधित’ औषधांचा वापर?

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 8:51PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दूध वाढीसाठी जनावरांसाठी वापरण्यात येणार्‍या व आरोग्यासाठी धोकादायक इंजेक्शनचा वापर करणार्‍या टोळीचा छडा नुकताच लावण्यात आला आहे. त्यानंतर मांस वाढीसाठी वापरण्यात येणार्‍या पक्षी,  प्राण्यांमध्येही निर्बंधित औषधांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला  आहे. शहरातील काही गवळ्यांकडून दूध वाढीसाठी अ‍ॅक्सिटोसीन या   निर्बंधित इंजेक्शनचा वापर केला जात होता. ही बाब पोलिसांनी उघड केली. यामध्ये गुंतलेल्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मांसासाठी कोंबडी, बकरी, शेळ्या व जनावरांनादेखील याप्रकारे बंदी घालण्यात आलेल्या औषधांचा वापर होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात दररोज 10 ते 15 हजार कोंबड्यांचे मटण खवय्यांकडून फस्त करण्यात येते. त्याचबरोबर  2500 ते 3000 बकरी, 1000 जनावरे मांसासाठी मारण्यात येतात. जनावरांच्या मांसाची निर्यातदेखील करण्यात येते. परंतु, यामध्ये आरोग्याची पुरेशी काळजी घेण्यात येत नाही. मांसासाठी ज्या प्राण्यांची कत्तल केली जाते त्यांची चिकित्सा पशुवैद्यकीय अधिकार्‍याकडून होणे बंधनकारक असते. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. त्यांची चिकित्सा होत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शेतकर्‍यांकडून शेतीला पूरक म्हणून कुक्कुट आणि शेळी पालनाचा व्यवसाय करण्यात येतो. याठिकाणी पक्ष्यांची वाढ जोमाने व्हावी, कमी कालावधीत अधिक मांस मिळावे यासाठी खाद्य देण्यात येते. काही वेळी इंजेक्शनचा वापर केला जातो. यामुळे कमी अवधीत झपाट्याने वाढ होते.

या प्रकारचे पक्षी, प्राणी मटणासाठी वापरतात. त्यांच्या आरोग्याची तपासणी होत नाही. मांसासाठी वापरण्यात येणार्‍या पक्षी अथवा प्राण्यांचे आरोग्य तपासणे बंधनकारक आहे. मात्र त्याकडे  यीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येते. पक्षी वाढीसाठी पोल्ट्रीधारकांकडून इंजेक्शनचा वापर होतो. काहीवेळा खाद्यातून अँटिबायोटिक स्वरुपातील औषधे देण्यात येतात. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आरोग्य तपासणीची जबाबदारी पशुचिकित्सा विभागाची आहे. परंतु दररोज मांसासाठी वापरण्यात येणार्‍या पक्षी, प्राण्यांची संख्या अधिक असते. त्याप्रमाणात पशुवैद्यांची संख्या उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतो.