होमपेज › Belgaon › मंत्री हेगडे यांचा दलित संघटनांकडून निषेध

मंत्री हेगडे यांचा दलित संघटनांकडून निषेध

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 10:37PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात बदल करावा, यासंबंधी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दलित संघटनांकडून त्यांचा निषेध करण्यात आला. चन्नमा चौकात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक दलित युवक संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून मोर्चा काढून चन्नमा चौकात निदर्शने करण्यात आली. मंत्री हेगडे यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. डॉ. आंबेडकर यांनी सर्व समाजाला डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिली. याला जगामध्ये मोठा आदर दाखविला जातो. असे असताना हेगडे यांनी घटनाबदलाचा विचार मांडला आहे. भाजपच्या या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दलित संघटनेकडून करण्यात आली. 

एका कार्यक्रमादरम्यान हेगडे यांनी हे वक्तव्य केले असून वेळेनुसार घटनेत अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. यापुढेही बदल करण्यात येतील. घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते धोकादायक ठरणारे आहे. अशी विधाने यापुढे करण्यात येऊ नयेत, अन्यथा देशभरात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. संघटनेचे राज्य कार्यदर्शी मोहन कांबळे, राज्याध्यक्ष महेश कोलकार, मार्गदर्शक मल्लेश कुरंगी, सुनील बस्तवाडकर, मारुती कांबळे, महेश गिड्डन्नवर, भारत कोलकार, विठ्ठल तळवार, यल्लाप्पा कांबळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते