Sun, May 26, 2019 16:39होमपेज › Belgaon › चन्‍नम्मा पथकाचे नेमके काम काय

चन्‍नम्मा पथकाचे नेमके काम काय

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 10 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात क्राईम रेट वाढतच आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना होत आहेत.  पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीला आवर घालण्याबरोबरच महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. पण महिलांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या चन्नम्मा महिला स्क्‍वॉडची नजर गुन्हेगारांऐवजी प्रेमीयुगुलांवर जास्त दिसते. दोन दिवसांपूर्वी कॅम्प येथील एका उद्यानात वावरणार्‍या प्रेमी युगुलांवर दांडगाईचा प्रयत्न चन्नम्मा महिला पोलिसांनी केला. यातून महिला पोलिसांना नक्की काय साध्य करायचे होते, हे उलगडलेले नाही.

काही महिन्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. युवती आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले आहेत. मात्र काही प्रकरणांत पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी होत्या. शिवाय अनेक पोलिस ठाण्यात गेल्यास सामान्य माणसाशी पोलिस कसे वागतात, हा संतापाचा विषय आहे. तक्रार करणार्‍या स्त्रीवरच अविश्‍वास दाखविण्यापासून सुरुवात होते. तिचे चारित्र्य आणि वेशभूषेवर टीकाटिपणी करीत तक्रारीचा विचार केला जातो. बर्‍याच प्रकरणात महिलांनी तक्रार नोंदवू नये, असेच सुचविले जाते. 

पोलिसांची स्थानकातील वागणूक पाहून कुठल्याच महिलेला तेथे जायचे धैर्य होत नाही. याकडे लक्ष देऊन जस्टीस वर्मा कमिटीने समाज आणि पोलिस दलात सकारात्मक आणि सहकार्याचे संबंध असावेत. यासाठी पोलिस प्रशासनाने सुधारणा घडवून आणण्याची आग्रही शिफारस केली आहे. कर्नाटक सरकारने युनिसेफच्या सहकार्याने सर्व पोलिसांना लिंग समभावाचे मूलभूत प्रशिक्षण देण्याचे काम चालवले आहे. पोलिस प्रशासनाबरोबरच महिला आणि बालकल्याण विभागानेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. यातूनच राज्यात चन्नम्मा महिला पोलिस स्क्‍वॉडची स्थापना झाली. राज्यातील काही शहरांत स्कॉडचे काम समाधानकारक आहे. पण बेळगावातील स्क्‍वॉड सार्वजनिक ठिकाणी महिला आणि युवतींवर होणार्‍या अत्याचाराकडे नजर ठेवण्याऐवजी प्रेमीयुगुलांमध्ये रस दाखवत आहे, त्याबद्दल तक्रारींचा सूर आहे.

‘सर्वोच्च’ आदेश, पण

सर्वोच्च न्यायालयाने दोन सज्ञान युवक-युवतींमधील संबंधांना लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपद्वारे मान्यता दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वोंच्च न्यायालयाने सज्ञान युवक-युवतीच्या प्रेमविवाहाला कोणीही विरोध करता कामा नये, असा आदेश बजाविला आहे. या आदेशामधून तरुण-तरुणींना मोकळ्या वातावरणात वावरण्याची संधी मिळाली आहे. याचा मान राखत आधुनिक युगातील तरुणाईने योग्य त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्वातंत्र्यावर प्रहार करण्याचे प्रयत्न बेळगावच्या महिला पोलिस ब्रिगेडने सुरू केले आहेत. 


दोन दिवसांपूर्वी कॅम्प परिसरातील उद्यानात महिला पोलिसांनी युगुलांवर केलेल्या कारवाईची माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने सज्ञान तरुण-तरुणींना दिलेल्या स्वातंत्र्याबाबतची खबरदारी घेऊन महिला पोलिसांनी युगुलांवर केलेल्या कारवाईची माहिती घेऊन पावले उचलली जातील.

-सीमा लाटकर, पोलिस उपायुक्त.