Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Belgaon › अल्पसंख्याकांचे घटनात्मक अधिकार पायदळी

अल्पसंख्याकांचे घटनात्मक अधिकार पायदळी

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:52PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीपासून ते नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका व जिल्हा पंचायतीचा कारभार हा संपूर्ण कन्नडमधूनच करण्यात यावा, असा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी बजावून त्यांनी अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांना व तरतुदींनाच आव्हान दिले आहे. या पद्धतीने एकाधिकार शाही व  हुकूमशाही पद्धतीने प्रशासकीय कारभार चालविण्याचा अधिकार झियाउल्ला यांना कोणी दिला, असा प्रश्‍न सीमाभागातील  मराठी जनतेकडून केला जात आहे.  बेळगाव जिल्ह्यातील भाषिक अल्पसंख्याक असलेल्या मराठी व उर्दू जनतेला त्यांच्या मातृभाषेतून सर्व सरकारी कारभार व सरकारी कागदपत्रे त्यांच्या मातृभाषेतून दिली पाहिजेत, असा आदेश राज्य व केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकार्‍यांना बजाविलेला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी जनतेची संख्या 22 टक्के इतकी आहे. तर मुस्लिमांची संख्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसीनुसार व कर्नाटक राज्य कार्यालयीन भाषा कायदा 1981 नुसार जिल्हाधिकार्‍यांनी मराठी व उर्दू भाषेतून त्या त्या जनतेला सरकारी कागदपत्रे उपलब्ध करुन दिली पाहिजेत. परंतु या कर्तव्यापासून अलिप्त असलेल्या व केवळ आपण कन्नडिगांचेच प्रतिनिधी असल्याचे समजून जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी सर्व व्यवहार केवळ कन्नडमध्ये केले पाहिजेत, असा हुकूमशाही पद्धतीचा फतवा काढून आपण केवळ राज्य सरकारचेच धोरण अंमलात आणणार व केंद्र सरकारचे धोरण पायदळी तुडविणार हेच सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेकडून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. आश्‍चर्य म्हणजे, भारतीय घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करून त्याप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची आहे. अल्पसंख्याकांचे हितरक्षण करणार्‍या कमिटीचे अध्यक्षही जिल्हाधिकारीच आहेत व राज्य सरकारच्या कन्नड अंमलबजावणी कमिटीचे अध्यक्षही तेच आहेत. या दोन्ही कमिट्यांचे अध्यक्ष  जिल्हाधिकारी असले तरी त्यांना अल्पसंख्याक हितरक्षण कमिटीचे अधिकार डावलण्याचा अधिकार ना राज्य सरकारने, ना केंद्र सरकारने दिला आहे. याचे जिल्हाधिकार्‍यांनी बाळगण्याची आवश्यकता आहे.