Fri, Mar 22, 2019 06:22
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › परिवर्तनवादी विचार होणार अधोरेखित

परिवर्तनवादी विचार होणार अधोरेखित

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:46PM

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

कॉ. अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून मांडलेले विचार काळाच्या पुढचे होते. त्यामुळेच आजच्या घडीलादेखील त्यांची उपयुक्तता असून त्यावर संमेलनात विचारमंथन घडणार आहे. नव्या पिढीला कॉ. साठेंच्या साहित्याची ओळख घडवून आणण्यात येणार आहे.

बेळगाव येथे 16 व 17 रोजी अण्णाभाऊ साठे संमेलन होणार आहे. यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. कॉ. गोविंद पानसरे प्रेरित आठवे संमेलन असून यापूर्वीची संमेलने महाराष्ट्रात पार पडली आहेत. 
कॉ. साठे संमेलन वैचारिक भूमिका घेऊन परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असणार्‍या कार्यकर्त्यांनी सुरू केले. त्याचा परिघ विस्तारत चालला आहे. पुरोगामी विचारसरणीला वाढता विरोध होत असताना प्रतिगामी शक्ती डोके काढत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही चळवळ गतिमान करण्यात येत आहे.

हे संमेलन भरविण्यामागे काही विचारधारा निश्‍चित केलेली आहे. केवळ संमेलनाच्या माध्यमातून चंगळवाद जोपासण्यापेक्षा आणि हस्तीदंती मनोर्‍यातील साहित्यांचे शब्दांचे फुलोरे फुलविण्यापेक्षा वैचारिक भूमिका घेऊन मंथन घडविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. 

नव्या पिढीला संमेलनाच्या माध्यमातून समग्र साहित्याचा परिचय घडवून आणण्यात येणार आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, ग्रंथ खरेदीची सवय लागावी आदी उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत.
सद्य:स्थितीत अण्णा भाऊंच्या साहित्य विचाराची उपयुक्तता वेगवेगळ्या पातळीवर तपासून पाहण्यात येणार आहे. यासाठी संमेलनात तीन परिसंवाद त्यांच्या साहित्यावर होणार आहेत. खाऊजा संस्कृतीमुळे कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय, दलित यांच्यावर विपरित परिणाम झाले आहेत. ग्रामव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. श्रमिकांचे प्रश्‍न जटिल बनत आहेत. वर्ग आणि जात व्यवस्था पुन्हा एकदा बळकट होत आहे. याच्यावर संमेलनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य

संमेलनाचे उद्घाटन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्याहस्ते होणार आहे. यासाठी पाच मंडक्यांची उतरंड ठेवण्यात येणार असून ते फोडून उद्घाटन होणार आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातीव्यवस्थेबाबत मांडलेली संकल्पना यासाठी घेतली  आहे.