Mon, Apr 22, 2019 05:49होमपेज › Belgaon › ऐतिहासिक महिपाळगडाची साफसफाई

ऐतिहासिक महिपाळगडाची साफसफाई

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 10:32PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-चंदगड तालुक्याच्या सीमेवर असणार्‍या आणि छ. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महिपाळगड (ता. चंदगड)  येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साफसफाई केली. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून झाडा-झुडपाने झाकोळून गेलेल्या ऐतिहासक किल्ल्याने मोकळा श्‍वास घेतला. मुंबई येथील दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीने महाराष्ट्र आणि सीमाभागातील किल्ल्यांवर श्रमदान करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिपाळगडच्या किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मागील नऊ वर्षापासून किल्ले स्वच्छता अभियान सुरू केले आहे. पुरातत्व खात्याच्या निकषानुसार आणि मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी सकाळी 10 वा दुसर्‍या टप्प्यातील स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी किल्ल्याच्या उत्तरेला असणारा बुरूज स्वच्छ केला. याठिकाणी झाडे वाढून भूपाषाणी कडा असल्यासारखे जाणवत होते. यासाठी स्थानिक युवकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर याठिकाणी उपबुरूज आढळून आला. याप्रकारचा उपबुरुज सहसा आढळून येत नाही. त्याचबरोबर याठिकाणी बुजलेली बांधीव चौकी उघडकीस आणण्यात आली.

सदर मोहीम दर पंधरवड्याला राबविण्यात येणार आहे. गडाचा विस्तार पाहता ही मोहीम दीर्घकाळ चालणार असून अनेक ऐतिहासिक वास्तू उघडकीस येण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात हा किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने उजेडात येण्याची शक्यता आहे. यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्रमदान करत आहेत. किल्ल्याचा विस्तार फार मोठा असून याठिकाणी भवानी मातेच्या मंदिरासह ऐतिहासीक विहीर आहे. त्याचबरोबर पायथ्याला वैद्यनाथाचे पुरातन मंदिर आहे.

रविवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत संघटक अभिजित अष्टेकर, सागर मुतकेकर, बाबू हणमशेट, नरेश जाधव, सचिन पाटील, नितीन पाटील, संजय गावडोजी या बेळगावच्या कार्यकर्त्यासह चंदगड तालुका संघटक अनिल केसरकर, शशिकांत सावंत, अनिकेत सावंत, अमोल पवार, वैजनाथ कदम तसेच स्थानिक युवकांनी सहभाग घेतला.