Thu, Jun 27, 2019 04:29होमपेज › Belgaon › कोट्यवधी खर्चूनही सांडपाणी उघड्यावरच

कोट्यवधी खर्चूनही सांडपाणी उघड्यावरच

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 8:14PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

शहराच्या विकासासाठी प्रत्येकवर्षी प्रत्येकी 100 कोटी रूपये विशेष अनुदान महापालिकेला मिळत आहे. विशेष अनुदानातील कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मनपा प्रशासन देत आहे. परंतु, प्रचंड प्रमाणात निधी खर्च करुनही शहरातील सांडपाण्याची समस्या कायम राहिली आहे. शहरातील सांडपाण्याच्या समस्येला प्रशासनाबरोबरच नागरिकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरला आहे.गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात शहरालगत अनेक नव्या वसाहती निर्माण झाल्या. वडगाव, अनगोळ, टिळकवाडी, मजगाव, खासबाग या भागात निर्माण झालेल्या अनधिकृत वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. त्याचबरोबर शहरातून वाहणार्‍या नाल्यांच्या जागांवरही अतिक्रमणे झाली. पूर्वीपासूनच शहराची सांडपाणी समस्या गंभीर असताना मोकाट बांधकामे आणि नाल्यांच्या जागेत झालेल्या अतिक्रमणांमुळे सांडपाणी समस्येत भर पडली.

वडगाव हे शहरातील जुने उपनगर आहे. याच उपनगराची व्याप्ती आता झपाट्याने वाढली आहे. नव्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामध्ये गेल्या वीस वर्षांपूर्वी वडगाव ते अनगोळ या मार्गावर वसती निर्माण झाली असून या परिसराला आनंदनगर असे संबोधण्यात येऊ लागले.   मात्र, नागरी समस्यांच्यादृष्टीने आनंदनगरात नेहमीच आनंदीआनंद पाहावयास मिळतो.
येथील नागरी समस्यांना प्रशासनाप्रमाणे काही स्थानिक नागरिकही जबाबदार आहेत. या भागात काही प्रमाणात रस्ते आणि गटारींची कामे झाली दिसतात. मात्र, स्वच्छतेचे काम नेहमीच वार्‍यावरच आहे. त्यातच नियोजनाअभावी बांधण्यात आलेल्या घरांमुळे काही महत्त्वाची विकासकामे राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने सांडपाण्याची समस्या मोठी डोकेदुखी ठरली आहे. केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभर  या भागात उघड्यावर वाहणारे सांडपाणी आरोग्याला धोकादायक ठरत आहे. 

अलिकडच्या काळात आनंदनगरशेजारी केशवनगर, अन्नपूर्णानगर, समृद्धी कॉलनी या नव्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. आनंदनगरातील सांडपाण्याची समस्या कायम असताना आसपासच्या परिसरात झालेल्या नव्या वसाहतींमुळे सांडपाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. अनगोळ आणि अन्य भागातून आनंदनगर परिसरात येणारे सांडपाणी पुढे बळ्ळारी नाल्याकडे जाण्यासाठी वाटच मिळत नसल्यामुळे आनंदनगरात तुंबून राहू लागले आहे. त्यामुळे येथील विहिरींचे पाणीही दूषित बनत आहे. वडगाव परिसरातील संभाजीनगर, यरमाळ, मंगाईनगर, ओमकारनगर, साईनगर, समर्थनगर या परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. या भागात काही ठिकाणी घालण्यात आलेल्या ड्रेनेज पाईपलाईनमधून सांडपाण्याच्या निचरा होत नसल्याने चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर तसेच उघड्यावरील जागेत पसरते.