Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Belgaon › शहरातील सिग्नल की, शोभेचे खांब?

शहरातील सिग्नल की, शोभेचे खांब?

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 9:53PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

स्मार्टसिटीत समावेश असणार्‍या बेळगाव शहरात वाहतूक जनजागृतीसाठी महापालिका व वाहतूक विभागाकडून कोणत्याच ठोस  उपाययोजना होताना दिसत नाहीत. शहरात अनेक ठिकाणी असलेले सिग्नल याला कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक पोलिसांचा धाक नसल्याने सिग्नल सुरु असतानाच पादचारी रस्त्यावरून ये-जा करतात. यामुळे पादचार्‍याच्या सुरक्षेचे कर्तव्य कोणाचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरातील अनेक सिग्नलचा वेळ 30 सेकंदापासून 90 सेकंदांपर्यंत आहे. बर्‍याचबेळा सिग्नलवर वाहतूक पोलिस  नसतो. अशावेळी वाहनधारकांकडून सिग्नल पडायच्या अगोदरच वाहने पुढे घेतली जातात. यावेळी झेब्रा क्रॉसिंग ओलांडणार्‍या पादचार्‍यांना याचा मोठा फटका बसतो. परिणामी अपघाताचाही धोका आहे. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग  पादचार्‍यांसाठी असते. मात्र, बहूतांश सिग्नलवर नियमांचे उल्लंघन करत झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहने आणून उभे केली जातात. अशावेळी पादचार्‍यांना आपला जीव धोक्यात घालून पुढे जावे लागते.  

शहरातील प्रत्येक सिग्नलवर पादचार्‍यांसाठी विशेष सिग्नलची व्यवस्था नाही. त्यामुळे इतर वाहनांबरोबर पादचार्‍यांना ये-जा करावी लागते. अशावेळी लहान मोठ्या अपघाताची शक्यता असते. अनेकवेळा सिग्नल व्यवस्थेत बिघाड झाल्याने सिग्नल बंद असतात. अशावेळी भरधाव येणार्‍या वाहनचालकांमुळे बर्‍याचवेळा अपघाताचा धोका निर्माण होतो. ज्येष्ठ नागरिक व महिलांना बराचवेळ रस्ताच ओलांडता येत नाही. अशावेळी सिग्नलमध्ये बिघाड किंवा वाहने ताबडतोब येत असल्याने त्यांना इतरांचा सहारा घ्यावा लागतो. सिग्नल व्यवस्था असूनदेखील ती कूचकामी ठरत असल्याने किमान वाहतूक पोलिसांनी तरी पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. असे चित्र कोणत्याही ठिकाणी दिसून येत नाही.  

शहरात यंदे खुट, चन्नम्मा चौक, गोगेट सर्कलसह आदी महत्त्वाचे सिंग्नल आहेत. मात्र, अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बसवेश्‍वर सर्कलसह आदी महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माजी अध्यक्षांच्या संघटनेतर्फे वाहतूक विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र,  वाहतूक विभागाचेही दुर्लक्षच दिसून येत आहे.