बेळगाव ः प्रतिनिधी
मतिमंद मुले म्हटले की डोळ्यासमोर येते ते त्यांचे वेंधळेपण! कोणाला जन्मापासून तर कोणाला अपघाताने मंतिमंदत्व येते. बेळगाव शहरात तब्बल 5 हजार मतिमंद आहेत. सहा शाळांमधून 200 मुले मतिमंदत्वावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. अन्य मुले अद्यापही अशीतशीच आहेत. या मुलांना शहरात खुल्या वातावरणात बागडण्यासाठी खास सोयीसुविधा असलेल्या उद्यानाची गरज भासत आहे.
मनपा उद्यानावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असते. मनपाने मतिमंदांसाठी खास बगीचा निर्माण केल्यास त्या मुलांना उल्हासाची नवी ताजी हवा मिळणार आहे. पाच वर्षांपूर्वी बेळगावातील काही तरूणांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्या विचारांनुसार सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा निश्चय केला. यातून अहमदनगर येथे हजारेंच्या मार्गदर्शनाखाली चालणार्या स्नेहालय संस्थेच्या प्रेरणेतून बेळगावात मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली. खासबाग येथील कै. गौतम बावडेकर यांनी स्नेहालय संस्थेला जागा दान दिली. नरेश पाटील, उदय कलघटकर तसेच अन्य कार्यकर्त्यांनी श्रमदानातून जागेची दुरूस्ती केली आणि स्नेहालयच्या बेळगावातील कामाला खर्या अर्थाने सुरूवात झाली.खासबाग येथील या शाळेत 35 मुलेमुली आहेत. स्नेहालयच्या कार्याची माहिती बेळगावातील एमएलआयआरसीचे तत्कालीन कमांडंट ब्रिगेडियर संतोष कुरूप यांना मिळाली.