Sun, May 26, 2019 15:42होमपेज › Belgaon › आवं पाटील, हे वागणं बरं नव्हं

आवं पाटील, हे वागणं बरं नव्हं

Published On: Jan 22 2018 10:02PM | Last Updated: Jan 22 2018 10:02PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमासमन्वयमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना कानडीप्रेमाचे भरते आले आहे. यामुळे सीमाबांधव संभ्रमात आहेत. ज्यांच्या खांद्यावर सीमाप्रश्‍नाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने दिली, त्यांनीच गोकाक तालुक्यात जाऊन कानडीप्रेमाचे गोडवे गायिले. यामुळे ‘आवं पाटील, हे वागणं बरं नव्हं’, असा नाराजीचा सूर  सीमाभागातून उमटत आहे. सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार आणि सीमाबांधव यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी समन्वयमंत्री नेमण्याची मागणी म. ए. समितीने अनेक वषार्ंपासून केली होती. त्यानुसार कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. याला तीन वर्षे  उलटली.

या काळात समन्वयमंत्री म्हणून पाटील यांनी बेळगावला एकदाही भेट दिलेली नाही. महामेळावा, काळादिन फेरी, हुतात्मादिन कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण समितीने दिले होते. परंतु, सीमाबांधवांकडे येण्यास त्यांना अद्याप फुरसत मिळालेली नाही. समन्वयमंत्र्याची नेमणूक केल्यानंतर सीमाभागातून समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु  भ्रमनिरास झाला आहे. अनेक खटपटी, लटपटी केल्यानंतर समिती नेत्यांना पाटील भेटले. यातून पदरात काय पडले, हा संशोधनाचाच विषय  आहे.

सीमाप्रश्‍न न्यायालयात आहे. कर्नाटकातील नेते आपले वजन केंद्रात वापरून सरकारला झुकविण्याचा प्रयत्न करत आहेत.  महाराष्ट्राने मात्र उदासीन भूमिका स्वीकारली आहे. समन्वयमंत्री म्हणून केंद्रातील मराठी मंत्र्यांशी संपर्क साधून सीमाप्रश्‍नी त्यांना सक्रिय करण्याची जबाबदारी पाटील यांची आहे. परंतु या ते कमी  पडत आहेत, असे सीमावासीयांचे म्हणणे आहे. गोकाक तालुक्यातील तवंग गावी पाटील यांनी हजेरी लावली. तेथे कानडी गीत म्हटले. हेच गाणे राजकुमार या कानडी नटाने लालपिवळा झेंडा हातात घेऊन गायिले होते. हाच झेंडा कानडी संघटनांकडून मराठी माणसांना खिजविण्यासाठी वापरला जातो. याची जाण पाटलांना असणे आवश्यक 

होती.‘जन्म मिळाला तर कर्नाटकात मिळावा’, अशा आशयाचे गाणे गाऊन पाटील यांनी महाराष्ट्रात जाण्याच्या एकाच ध्येयाने झपाटलेल्या लाखो सीमाबांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. त्याचा निषेध सीमाभागात होत असून ‘पाटील, हे वागणे बरं नव्हं’, अशा भावना व्यक्त होत आहेत.

 याचा विसर पडला का?

सीमाभागात ‘जय महाराष्ट्र’ घोषणा देण्यास बंदी घालण्याचा कायदा करण्याचा प्रयत्न येथील नगरविकासमंत्री करत आहेत. जय महाराष्ट्र म्हणणार्‍या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याची धमकी देण्यात येते. कर्नाटकात ‘छ. शिवाजी महाराज की जय’ म्हणण्यास बंदीची मागणी कानडी म्होरक्यांकडून होते. येळ्ळूर येथील ‘जय महाराष्ट्र’ फलक हटविण्यात येतो. विरोध करणार्‍या नागरिकांना गुरासारखे झोडपण्यात येते. याचा विसर चंद्रकांत पाटील यांना पडला का, असा संतप्त सवाल सीमाबांधवांतून उपस्थित केला जात आहे.