Wed, Mar 27, 2019 02:26होमपेज › Belgaon › सीमावासीयांचे मराठीप्रेम धगधगते

सीमावासीयांचे मराठीप्रेम धगधगते

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:01PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक सरकार मराठी बांधवांवर कितीही अत्याचार करत असले, मराठी संस्कृती पुसून टाकण्याचे प्रयत्न करत असले तरी, सीमावासीयांच्या अंतःकरणात धगधगत असणारे मराठीप्रेम अढळ असल्याचे मत बार्शी येथील शिवव्याख्याते खंडू डोईफोडे यांनी व्यक्‍त केले. तालुका म. ए. स. युवा आघाडीने बेनकनहळ्ळी येथे शुक्रवारी युवा मेळावा आयोजित केला होेता. त्यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून खंडू डोईफोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ता. म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, महाराष्ट्र शासनाचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, लता पावशे, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे आदी होते.

 डोईफोडे म्हणाले, अनेक वर्षांपासून सीमाबांधव महाराष्ट्रात येण्यासाठी झुंज देत आहे. त्यांच्या त्यागाला आणि लढ्याला तोड नाही. लढण्याची ही प्रेरणा शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळते. यामुळेच  अन्याय,  त्याचाराविरोधात हा लढा अविरतपणे सुरू आहे. येळ्ळूर येथे उभारण्यात आलेला आणि सीमाबांधवांच्या  मराठी प्रेमाची साक्ष देणारा महाराष्ट्र राज्य फलक कर्नाटकाने आकसाने काढून टाकला. पण मनातील मराठीप्रेम कोणीही काढून टाकू शकणार नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने नवा इतिहास मांडण्याचा खटाटोप काहीनी सुरू केला आहे. त्यामुळे जागृत होण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी मातीतून माणूस घडविण्याचे काम केले. त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. तलवारीच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळविली नाही. तर माणसे उभी केली, असेही ते म्हणाले. अन्यायाविरोधात मराठी माणसाला उभे करण्याचे काम महाराजांनी केले. मातीतून माणसे उभी केली. त्यांच्यातला स्वाभिमान जागा केला. यासाठी अठरापगड जातीच्या सर्व समाजाला जागे केले. यामुळे स्वराज्याची दौलत उभी राहिली.  दिनेश ओऊळकर यांनी ‘सीमाप्रश्‍नाची सद्यस्थिती’, लता पावशे यांनी ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ या विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्याला युवा, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी, गौडाचा निषेध

कानडीकरणाचा फतवा काढणारे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या नारायणगौडाचा निषेधाचा ठराव यावेळी संंमत करण्यात आला. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला  यांनी सीमाभागातील सार्वजनिक, सरकारी कार्यालयातील सर्व फलक, माहितीपत्रके कानडीतून देण्याचा फतवा काढला आहे. ही कर्नाटक सरकारची दंडेलशाही असून त्याचा निषेध मेळाव्यात करण्यात आला.  त्याचबरोबर ‘शिवाजी महाराज की जय,’ म्हणण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या करवेचा म्होरक्या नारायणगौडा याचा सभेत निषेधाचा ठराव युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांनी मांडला. उपरोक्‍त ठराव टाळ्यांचा गजरात संमत केला.