Tue, May 21, 2019 00:52होमपेज › Belgaon › सीमावासीयांना न्याय मिळणारच

सीमावासीयांना न्याय मिळणारच

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:01PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भावना प्रकट करण्याचे भाषा हे प्रभावी माध्यम असते. त्यामुळे भाषा संवर्धन आवश्यक असून, मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. सीमाबांधव 70 वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी झुंजत आहेत. न्यायालयात हा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. सीमावासीयांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पुणे येथील संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केला. 
सांबरा येथील मायमराठी साहित्य संघातर्फे रविवारी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी उल्हासदादा पवार संमेलनाध्यक्ष या नात्याने बोलत होते. 

व्यासपीठावर ज्येष्ठ लेखिका विजया वाड, चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, चंद्रकांत जोशी, सूर्यकांत निंबाळकर, मायमराठी साहित्य संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते. उल्हासदादा म्हणाले, सीमाबांधव जीवाचे रान करून लढा लढत आहेत. 1946 साली बेळगावात झालेल्या संमेलनात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करण्यात आला. तरीदेखील हा भाग अद्याप महाराष्ट्रात नाही, ही हाराष्ट्राची खंत आहे. मातृभाषेतील शाळा ओस पडत आहेत, हे धोक्याचे आहे. मातृभाषेतून शिक्षण झालेल्या मुलांची आकलनशक्ती अधिक असते, हे भाषातज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. इंग्रजीची भ्रामक कल्पना बाळगू नये.  शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर हे ग्रामीण भागातल्या मराठी शाळेत शिकले. त्यांचे इंग्रजी माध्यमाशिवाय काही अडले नाही. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानेश्‍वर, 

तुकाराम माहित नाहीत. त्यांना संस्कृतीची जाण नसते. ही शोकांतिका आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. सर्व पुरावे सादर केले आहेत. लाखो सह्यांचे निवेदन पाठविले आहे. तरीही मान्यता नाही. हा लढा तीव्र करावा लागणार आहे. सीमाभागात होणारी संमेलने ही सर्वसमावेशक असतात. बेळगाव, कारवार, धारवाड हा भाग साहित्य आणि लोकसंस्कृतीच्या दृष्टीने अधिक सकस आहे. तेथे दर्जेदार साहित्यिक, कलावंत आहेत. मराठी जगात 9 व्या क्रमांकाची भाषा असल्याचे पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. अशोक अलगोंडी, कृष्णा जत्राटी यांनी केले.  वाय. के. धर्मोजी यांनी आभार मानले.