Mon, Mar 25, 2019 02:52
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बेळगावातील फलकांचे कानडीकरण करण्याचा फतवा

बेळगावातील फलकांचे कानडीकरण करण्याचा फतवा

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMबेळगाव : प्रतिनिधी

येत्या 1 नोव्हेंबरपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील सर्व दुकानांसह आस्थापनांचे फलक कन्‍नड भाषेत लावण्यात यावेत, यासाठी सक्‍तीची मोहीम राबवा, असा आदेश कन्‍नड विकास प्रधिकरणाचे अध्यक्ष प्रा. एस. जी. सिद्धरामय्या यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी कन्‍नड अनुष्ठान समितीची बैठक घेतली. तीत सिद्धरामय्या कन्‍नडसक्‍तीवर घसरले.

सिद्धरामय्या म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात अन्य भाषांचे फलक दिसत आहेत. येता 1 नोव्हेंबर म्हणजे कर्नाटक राज्योत्सवापूर्वी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉस्पिटल, आस्थापने, चौकांचे फलक कन्‍नडमध्ये करण्यात यावेत. इंग्रजीसह इतर भाषांत असणारे फलकही कन्‍नड भाषेतच करण्यासाठी सक्‍ती करण्यात यावी.  उपनगरे, उद्यानांना नावे देताना कन्‍नड साहित्यिकांना प्राधान्य द्यावे. एखाद्या ठिकाणी इतर भाषिकांची संख्या अधिक असेल, तर अशा ठिकाणी किमान 60 टक्के फलक कन्‍नड भाषेतच लागतील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. यासाठी जनजागृती मोहीम राबवून प्रशासनाला तशा सूचनाही करण्यात याव्यात.

इतर राज्यांतून येऊन कन्‍नड शिकणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, शासकीय निमशासकीय खात्यांतील नियुक्त्या करताना इतर राज्यांतून येणार्‍या कन्‍नड भाषिकांना पाच टक्के आरक्षण आहे, याचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

अखिल भारतीय स्तरावरून कर्नाटकात आलेल्या बँक अधिकार्‍यांनी सहा महिन्यांत कन्‍नड भाषा शिकणेसक्तीचे आहे. यामध्ये त्यानी हयगय केल्यास कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिली. प्रत्येक तीन महिन्याला कन्नड अनुष्ठान  विकासची आढावा बैठक घेऊन तो अहवाल देण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिला.

बैठकीला जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, बेळगावचे पोलिस आयुक्‍त डी. सी. राजाप्पा, जिल्हा पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, पोलिस अधिक्षक सुधिरकुमार रेड्डी, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी एच. बी. बुद्याप्पा, जिल्हा कन्नड जागृती समितीचे सदस्य डॉ. सर्जु काटकर आदी उपस्थित होते. प्रा. सिद्धरामय्यांनी विभागवार आढावा घेतला.अनंतकुमार ब्याकूड, डॉ. वीर शेट्टी, श्रीशैल करीशंकर आदी उपस्थित होते. 

समाजकल्याणला नोटीस देणार

समाजकल्याण विभागात झालेल्या नोकर भरतीसाठी उमेदवारांकडून इंग्रजी भाषेत अर्ज भरुन घेण्यात आले असून, हा कायद्याचा भंग आहे. या संबंधी समाजकल्याण विभागाला नोटीस देण्यात येणार असून, त्यांनी सामाधानकारक खुलासा केला नाही तर संबंधित अधिकार्‍यांवर करावाई करण्यात येईल, असा इशाराही सिध्दरामाय्यांनी दिला.