Tue, Apr 23, 2019 22:37होमपेज › Belgaon › झिरो टॉलरन्सवर रहदारीचा बोजवारा!

झिरो टॉलरन्सवर रहदारीचा बोजवारा!

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 8:55PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

बेळगाव शहरात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात शहर पोलिस वाहतूक नियंत्रण व्यवस्था कूचकामी ठरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील एकमेव झिरो टॉलरन्स कॉलेज रोडवर वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक विद्यार्थी भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

शहर- उपनगर परिसरातील महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या वाहनांची गर्दी डोकेदुखीचा विषय बनला आहे. रहदारी पोलिसांनी कॉलेज व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांच्या वाहनांची सोय करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. रहदारी पोलिसांच्या सूचनेनुसार काही महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या वाहनांची कॅम्पस परिसरात सोय केली. मात्र बर्‍याच व्यवस्थापनांनी रहदारी पोलिसांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले आहे.

ज्योती महाविद्यालय, बी. के. महाविद्यालय, मराठा मंडळ, शेख महाविद्यालय आदी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी आपल्या आवारात पार्किंग व्यवस्था केलेली आहे. मात्र कॉलेज रोडवर दुतर्फा विद्यार्थ्यांच्या वाहनांची गर्दी दिसते. कॉलेज रोड झिरो टॉलरन्स रोड घोषित करण्यात आला आहे. चन्नम्मा चौकापासून ध. संभाजी चौका दरम्यानच्या कॉलेज  या मार्गावर पार्किंग करण्यास कोणालाही अनुमती नाही. यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी कॉलेज रोडवरील शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या वाहन पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना केली होती. त्यानंतर पोलिस लाईन रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या वाहन पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात आली होती. त्याला कॅण्टोन्मेंट बोर्डाने आक्षेप घेतला होता.

रहदारी पोलिस आणि कॉलेज व्यवस्थापनाच्या वादात कॉलेज रोडवरील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कॉलेज रोडवर वाहनांची दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच याच मार्गावरुन अवजड वाहने आणि रुग्णवाहिकांची ये-जा असते. मार्गावर अनेकवेळा ट्रॅफिक जॅमचे प्रकार घडत असतात. ट्रफिक जॅममध्ये अनेकवेळा रुग्णवाहिका अडकून राहतात. तसेच बस आणि वडापमधून जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होते. अनेकवेळा या मार्गावरुन मिरवणुका, मोर्चे, रॅली निघतात. त्यावेळी मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडते. वारंवारच्या टॅफिक जॅममुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.