Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Belgaon › बेळवट्टीत विकासाला खीळ

बेळवट्टीत विकासाला खीळ

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:06PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

बेळवट्टी (ता. बेळगाव) गाव सुमारे 60 वर्षापासून विकासापासून वंचित आहे. येथील रस्ते, गटारी, पथदीप आदी समस्या जैसे थे आहेत. लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने विकासकामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात  आहे.  1960 साली बेळवट्टी गावचे पुनर्वसन करण्यात आले होतेे. यानंतर गावाच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

गावातील गटारी अस्वच्छ आहेत. गवत, पालापाचोळा व प्लास्टिकच्या बाटल्यांनी गटारी भरल्या आहेत. त्यामुळे स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. सांडपाण्याची समस्या देखील जैसे थे असून सांडपाण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गटारींतून सांडपाणी साचल्यामुळे गावात डासांचा प्रार्दूभाव वाढला आहे. मराठी शाळा, ग्राम पंचायतीसमोरील गटारीत झाडेझुडुपे वाढली असून सांडपाण्याने गटारी तुडूंब भरल्याने शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत अनेकवेळा सांगूनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 
गावातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अनेक वर्षापासून रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आलेले नाही. रस्त्यांवर खड्डेचखड्डे पडले असून धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकार्‍यांना अनेकवेळा निवेदन देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे. गावात बस वेळेवर येत नसल्याने अनेकवेळा ग्रामस्थांनी संबंधित विभागाला निवेदन दिले आहे. मात्र, परिवहन मंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच गावातील बसथांब्यांची देखील दुर्दशा झाली आहे. गावात अनेक वर्षापासून मोबाईल टॉवरची मागणी केली जात आहे. मात्र, टॉवर उभारण्यात आला नसल्याने रेंजअभावी फोन करताना अडचणी निर्माण होत आहेत, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात येत आहेत.