Wed, Jan 16, 2019 15:52होमपेज › Belgaon › ध. संभाजी चौकाचे होणार सुशोभिकरण

ध. संभाजी चौकाचे होणार सुशोभिकरण

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:55PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी  

येथील ध. संभाजी चौकाच्या सुशोभिकरण कामाला शुक्रवारी प्रारंभ झाला आहे. पाच लाख रुपये खर्च करुन या ठिकाणी विविध कामे हाती घेण्यात आल्याची माहिती माजी महापौर सरिता पाटील यांनी दिली. शुक्रवारी सकाळी महापौर संज्योत बांदेकर यांच्या उपस्थितीत ध. संभाजी चौक सुशोभीकरण कामाला सुरुवात झाली. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सरिता पाटील म्हणाल्या, बेळगाव शहराच्या इतिहासात ध. संभाजी चौकाला आगळे महत्त्व आहे. या चौकात ध. संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.पुतळ्याची पूजा-अर्चा आणि अभिषेक केला जात असतो. विविध कार्यक्रमही चौकात होत असतात. ध. संभाजी चौकाचे सुशोभीकरण केले  जावे, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून सुरू होती. त्या मागणीची दखल घेत चौकाच्या सुशोभीकरणासाठी मनपा दरबारी पाठपुरावा सुरू होता.चौकाच्या सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 

पाच लाख रुपयांतून चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. आकर्षक पध्दतीचे ग्रेनाईट आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. पुतळ्याच्या बाजूस नवीन संरक्षक रिलिंग बसविण्यात येणार आहेत. ध.संभाजी चौकाबरोबरच टिळक चौक आणि सम्राट अशोक चौकात सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सरिता पाटील यांनी स्पष्ट  केले. यावेळी महापौर संज्योत बांदेकर यांच्यासह नगरसेविका माया कडोलकर, मनपा अभियंते एन. व्ही.हिरेमठ, मदन बामणे, किरण गावडे व परिसरातील व्यापारी, कार्यकर्ते उपस्थित होते.